नगर : विहिरीत पडल्याने हरणाचा करुण अंत | पुढारी

नगर : विहिरीत पडल्याने हरणाचा करुण अंत

वळण, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील वळण पाथरे रस्त्यालगत वळण शिवारामध्ये शेतकर्‍याच्या विहिरीत नर जातीचे हरीण पडून त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी शेतकर्‍याच्या लक्षात आली.

दरम्यान, ही माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी मृत हरण ताब्यात घेत जागेवर पंचनामा केला.
वळण-पाथरे रस्ता शिवारातील विजय शेळके यांच्या (गट नंबर 219) मधील विहिरीमध्ये हे मृत हरीण पाण्यात तरंगताना आढळले. कपाशीवर औषध फवारणीसाठी विहिरीतून पाणी आणण्यासाठी सुनील विजय शेळके गेले असता त्यांना ते निदर्शनास पडले.

वन शेत्रपाल वाय. जे. पाचरणे, वनरक्षक एस. एस. जाधव, वन मजूर महादेव शेळके हे वाहनासह दाखल झाले. त्यांनी हे काळवीट नसून नर जातीचे हरीण असून, साधारणतः तीन वर्षांचे असल्याचे सांगितले. विहिरीच्या बाजूने गिन्नी गवतामुळे अंदाज न आल्यानेच हरिण पळताना विहिरीत पडल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

यावेळी राजेंद्र रामदास शेळके, सुनील विजय शेळके, गणेश अण्णासाहेब आढाव आदींच्या समक्ष पंचनामा केला. त्यानंतर वन कर्मचार्‍यांनी शवविच्छेदन करून बारागाव नांदूर रोपवाटिकेत अंत्यविधी केला.

Back to top button