नगर : …अन्यथा विद्यालयास टाळे ठोकणार!; पालकांचा इशारा | पुढारी

नगर : ...अन्यथा विद्यालयास टाळे ठोकणार!; पालकांचा इशारा

चांदेकसारे, पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूलची इमारत समृद्धी महामार्गात बाधीत झाली. भरपाईपोटी साडेतीन कोटी रुपये मिळाले. मात्र, याच पैशावरून भारत सर्व सेवा संघाची न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक स्कूल कमिटी व जुने चांदेकसारे स्कूल कमिटी ट्रस्ट यांच्यात वाद सुरू आहेत. दरम्यान, दहा दिवसांत इमारतीसंदर्भात निर्णय न घेतल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा शाळा बचाव कृती समितीचे मार्गदर्शक केशवराव होन व भिवराव दहे यांनी दिला आहे.

साडेतीन कोटी रुपये न्यायालयात पडून आहेत. चार वर्षांपासून गावातील विद्यार्थी पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेतात. इमारतीला निधी असूनही त्याचा उपयोग होत नसल्याने चांदेकसारे पंचक्रोशीतील पालक आक्रमक झाले. यावेळी चांदेकसारे स्कूल कमिटी ट्रस्टतर्फे न्यायालयात दावा दाखल करणारे ट्रस्टचे अध्यक्ष संजय होन, स्कूल स्थानिक स्कूल कमिटीचे शंकरराव चव्हाण, सुनील होन, आनंदराव चव्हाण, कोल्हे कारखाना संचालक अ‍ॅड. ज्ञानेश्वर होन, मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव, प्रा. विठ्ठल होन, जगन्नाथ होन, अशोक होन, भाऊसाहेब होन, अनिल होन, संतोष पवार, सचिन होन, राधाजी होन, शिवाजी होन, भाऊसाहेब दहे, अशोक होन, कल्याण दहे, केशव ढमाले, पाराजी ढमाले, दिलीप दहे, बाबासाहेब होन, मोहन दहे, धर्मा दहे, रावसाहेब होन, रवींद्र खरात आदींसह पालक उपस्थित होते.

दोन कमिट्यांचे वाद… विद्यार्थ्यांचे नुकसान..!

शाळेतील दोन कमिट्यांचे वादी-प्रतिवादी संस्थांनी दोन पावले मागे घेवून, मुलांच्या भविष्यासाठी हा निधी भव्य इमारतीसाठी वापरता येईल, असे पालकांनी आक्रमक होत या कमिटी सदस्यांना धारेवर धरले. विद्यार्थ्यांनीही या शाळे संदर्भात गेल्या चार वर्षांपासून अत्यंत दुरवस्था असल्याची ओरड करीत, पत्र्याच्या शेडमुळे पाऊस, ऊन, वारा यामुळे शिक्षण घेताना या वर्गातील आवाज त्या वर्गात गेल्याने शैक्षणिक नुकसान झाल्याचे सांगितले.

चांदेकसारे स्कूल कमिटी ट्रस्टच्या वतीने संजय होन यांनी भूमिका स्पष्ट करीत, मिळालेला निधी केवळ चांदेकसारे गावासाठी आहे. या निधीचा उपयोग शाळेसाठी होणार असल्यास आमची सामंजस्याची भूमिका घेण्यास तयारी आहे. या निधीवर भारत सर्व सेवा संघाचा कुठलाही हक्क नाही, असे ते म्हणाले. शंकरराव चव्हाण म्हणाले, प्रतिष्ठितांना एकत्र घेऊन नवी कमिटी करण्यास आमची हरकत नाही. मात्र, जुनी चांदेकसारे स्कूल कमिटी ट्रस्ट बरखास्त व्हायला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कृती समितीने मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांना निवेदन दिले.

गेल्या चार वर्षांपासून मिळालेला निधी जवळपास साडेतीन कोटी रुपये न्यायालयात पडून आहे. दोन कमिट्यांच्या वादापायी यावर व्याज नाही आणि त्याचा फायदा नाही. याचा कोर्टाचा निकाल केव्हा होईल, हे सांगता येत नाही.

सातशे मुलांचे भविष्य उघड्यावर!

गेल्या चार वर्षांपासून न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे येथे शिकत असलेल्या सातशे मुलांचे भविष्य उघड्यावर आले आहे. पत्र्याच्या छोट्या-छोट्या खोल्या बांधून ही मुले शिक्षण घेत आहेत.

Back to top button