अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास १० वर्षांचा कारावास | पुढारी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास १० वर्षांचा कारावास

अकोले (अहमदनगर) : वृत्तसेवा : तालुक्यातील शिरपुंजे येथील एका पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवर चक्क पित्यानेच अत्याचार केला होता. ही संतापजनक घटना जून २०१७ साली घडली होती. या प्रकरणी अत्याचार पित्यावर २०१८ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल आज, शनिवारी (दि. १६ जुलै) लागला. या अत्याचार प्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांनी आरोपी पित्याला दहा वर्षांच्या कारावासासह ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

यासंबंधीची सविस्तर माहिती अशी कि, अकोले तालुक्यातील शिरपूंजे येथे रहिवासी असलेल्या एका कुटुंबातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या १५ वर्षाची मुलीवर स्वत:च्या बापानेच जुन २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात बाप दारु पिऊन अत्याचार केला होता. यावेळी त्या लहान मुलीने प्रतिकार केला असता बापाने आपल्याच पोटच्या मुलीला दमबाजी करीत गप्प बसवले आणि बळजबरीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

यावेळी लहान मुलीला प्रचंड वेदना होवू लागल्याने तीला रडू लागली. त्या आवाजाने जवळच झोपलेली तिची आई आणि दोन्ही भाऊ जागे झाले व ‘तु का रडतेस ?’ अशी विचारणा करु लागले. त्यावर पीडितेने आपल्याच बापाने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगताच त्या तिघांचाही संताप झाला. मात्र दारुड्या नराधमाने उलट दमबाजी व शिवीगाळ करीत त्या तिघांनाही गप्प केले. त्यावरही न थांबता ‘जर कोणी या प्रकाराबाबत कोठे काही बोलले तर जीवे मारण्याचा सज्जड दम दिल्याने पीडितेसह ते संपूर्ण कुटुंब घाबरले होते.

संबंधित बातम्या

या घटनेतून पीडिता गर्भवती राहीली, मात्र बापाच्या धाकाने घरातील कोणीही बाहेर काही बोलण्यास धजावत नव्हते. पीडितेच्या पोटातील गर्भ सात महिन्यांचा झाला. त्यामुळे तिला वेदना होवू लागल्याने अखेर तिच्या आई व भावांनी तिला एका खासगी डॉक्टरांकडे नेले व औषधोपचार घेतले. हा सगळा प्रकार संशयात्मक वाटल्याने संबंधित डॉक्टरांनी याबाबत त्यांना विश्‍वासात घेवून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता ते सगळेच घाबरले व तेथून निघून गेले. त्यामुळे संशय बळावलेल्या त्या डॉक्टरांनी अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेला घडला प्रकार कळविला. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच दि १२ फेब्रुवारी २०१८ रोजी स्नेहालय संस्थेचे हर्षदा गोले, संतोष धर्माधिकारी व अखील पठाण हे तिघे पीडितेच्या घरी आले व त्यांनी त्या कुटुंबाला धीर देत राजूर पोलीस ठाण्यात आणले. १५ फेबु्रवारी २०१८ रोजी सदर पीडितेने आपल्या आईसह नराधम पित्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर राजूरचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी त्या नराधमास गजाआड करीत घटनेचा बारकाईने तपास करुन संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षाच्या वतीने अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद करीत न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर करीत सतरा साक्षीदार तपासले. या खटल्यात पीडित मुलगी व तिची आई दोघेही फितूर झाले. मात्र या प्रकरणात पीडिता गर्भवती राहिल्याने व अहमदनगर जिल्हा रुग्णलयातील तपासणीत पोटातील गर्भ तिच्या बापाचेच असल्याचेही स्पष्ट झाले.

या दरम्यान १२ एप्रिल २०१८ रोजी पीडितेने बाळाला जन्म दिला, मात्र बाळाची स्थिती गंभीर असल्याने २० एप्रिलरोजी त्याचा मृत्यू झाला. पीडितेने बलात्काराची तक्रार दाखल केलेली असल्याने राजूरचे तात्काळ स.पो.नि.कादरी यांनी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून मयत बाळाच्या हाडाचे नमुने शाबीत ठेवण्याची सूचना केली होती.

त्यानुसार रुग्णालयाने बाळाच्या पायाचे हाड सुरक्षित ठेवले होते, नाशिक येथील वैद्यक प्रयोगशाळेतील तपासणीत बाळाचा आणि पीडितेच्या बापाचा डिएनए जुळाल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व पुराव्यांसह सरकारी अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी उच्च न्यायालयातील विविध दाखले देत जोरदार युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या प्रकरणात १० वर्षांचा सश्रम कारावास व १५ हजार दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षाचा कारावास, पोस्कोच्या कलम ४ अंतर्गत १० वर्षांचा कारावास व १५ हजार रुपये दंड सुनावला. तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची कैद अशी शिक्षा सुनावली.

Back to top button