[author title="जान्हवी पाटील" image="http://"][/author]
रत्नागिरी ः आपण आतापर्यंत तांदूळ, नाचणी, विविध भाज्यांचे फ्लेवर असलेले पापड खाल्ले आहेत. मात्र चक्क समुद्रातील माशांपासून पापड बनविण्यात येत आहेत. तालुक्यातील पावसनजीक असणार्या कोळंबे गावात कोळंबी लोणचे प्रसिद्ध होते. आता चक्क माशांपासून पापड बनविले जात आहे. असा प्रयोग महिला बचतगटाकडून पहिल्यांदाच करण्यात येत असून, हे उत्पादन आता रत्नागिरीतील स्थानिक बाजारपेठेत आले आहे.
हे पापड अतिशय चविष्ट आणि खायला वेगळीच मेजवानी असणार आहे. यासाठी बचतगटाच्या महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोळंबे गावातील महिलांनी प्रत्यक्षात मच्छीपासून पापड बनविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मच्छीपासून पापड बनविणे हा प्रयोग आता कुतूहलाचा विषय ठरणार आहे.
या मत्स्य मूल्यवर्धित पदार्थांच्या प्रशिक्षणासाठी मुंबईतील इंडियन कौन्सिल ऑफ रिसर्च सेंटरमध्ये कोळंबे गावातील 3 महिलांना पाठविण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरु झाला आहे. या प्रकल्पाच्या व्यवस्थापक म्हणून योगिता भाटकर काम पाहत आहेत. या प्रकल्पाच्या युनिटमध्ये 10 महिलांचा सहभाग असून हा एक रोजगार महिलांना उपलब्ध झाला आहे. याच गावातील बचतगटाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात कोळंबीपासून लोणचंदेखील बनविले असून, हेदेखील उत्पादन बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मच्छीपासून पापड बनविण्यात येत आहे. सध्या रत्नागिरी बाजारपेठेत ठराविक ठिकाणी हे पापड उपलब्ध आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी अंतर्गत लोकसंचलित साधन केंद्र, नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला व उद्यम विकास प्रकल्प मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ प्रकल्प म्हणून हाती घेण्यात आले आहे. यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून 60 टक्के, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून 25 टक्के आणि 15 टक्के अनुदान लोकसंचलित साधन केंद्राकडून प्राप्त झाले असून, हा एकूण प्रकल्प 54 लाखांचा आहे. मत्स्य पापड खाण्यासाठी अतिशय चविष्ट असून, हा वेगळा प्रयोग लवकरच यशस्वी होईल, अशी माहिती जिल्हा प्रकल्प समन्वय महिला आर्थिक विकास महामंडळाचे अंबरीश मेस्त्री यांनी दिली.