अहमदनगर: गुन्ह्यातील पसार आणि पाहिजे असलेल्या आरोपींना पोलिसांकडून संधी; 17 जुलैला शरणागती मेळाव्याचे आयोजन | पुढारी

अहमदनगर: गुन्ह्यातील पसार आणि पाहिजे असलेल्या आरोपींना पोलिसांकडून संधी; 17 जुलैला शरणागती मेळाव्याचे आयोजन

अहमदनगर: विविध गुन्ह्यातील पसार व पाहिजे असलेल्या आरोपींना जिल्हा पोलीस दलाकडून एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलिसांनी 17 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता पोलीस मुख्यालय येथे अभिलेखावरील आरोपी शरणागती मेळावा अयोजित केला आहे. शरण येणार्‍या आरोपींवरील गुन्ह्यांची शहानिशा करून त्यांना कायदेशीर तरतूदीचा फायदा करून देण्यात येणार आहे. अशा आरोपींनी शरणागती मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

गुन्ह्यात पाहिजे असलेले, पसार व पॅरोलवरील आरोपी मोठ्या प्रमाणावर पसार आहेत. अशा 4हजार 444 आरोपींची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यातील सुमारे एक हजार सहाशे आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर पसार आरोपींना शरण येण्यासाठी पोलिसांनी मेळावा आयोजित केला आहे. गुन्ह्यातील आरोपी कायदेशीर प्रक्रियेस सामोरे न गेल्याने आरोपीसह त्याच्या कुटुंबियांना नाहक मानसिक त्रास होतो. पोलिसांकडून वारंवार तपासकामी आरोपीच्या राहत्या ठिकाणी तपासणी केली जाते.

पसार आरोपींनी शरणागती मेळाव्यात शरणागती केल्यास अशा आरोपींना कायद्याच्या चौकटीमध्ये राहुन कमीत कमी त्रास होईल याची खात्री करून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. शरणागती करणार्‍या आरोपींवरील दाखल सर्व गुन्ह्यांची सत्यता पडताळणी केली जाणार आहे. तांत्रिक किंवा आपसातील दाखल किरकोळ गुन्हे जे तडजोड पात्र असल्यास न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कायदेशीर मार्गदर्शन करून गुन्हे निकाली काढण्यास मदत केली जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Back to top button