दुष्काळग्रस्त भागासाठी जनाई योजना कार्यान्वित; माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार | पुढारी

दुष्काळग्रस्त भागासाठी जनाई योजना कार्यान्वित; माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार

सुपे : दौंड, बारामती, पुरंदर या तीन तालुक्यांना शेती पाण्यासाठी वरदान ठरणारी जनाई उपसा जलसिंचन योजना माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आदेशानुसार कार्यान्वित करण्यात आली आहे. धरणक्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणे तुडुंब भरली आहेत.

मात्र, सुपे व परिसरातील गावांमध्ये पावसाचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. ऊस लागवड, खोडवा ऊस व अन्य पिकांना पावसाची आवश्यकता आहे, ही बाब लक्षात घेऊन सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे, बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधून जनाई, शिरसाई उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याची विनंती केली होती. पवार यांनी तातडीने ही योजना सुरू करण्याचे आदेश दिले.

खडकवासला धरण 100 टक्के भरले असल्याने या धरणातून पाणी सोडून जनाई योजनेसाठी वरवंड तलावात पाणी घेण्यात आले. या योजनेद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यातून तलाव भरण्यात येणार आहेत. मात्र, जे लाभार्थी शेतकरी पाणीपट्टी भरतील, त्यांनाच पाणी देण्याची सूचना अजित पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना केली आहे.

Back to top button