नगर : राहाता रुग्णालय ‘कुटुंब’शस्त्रक्रियेत जिल्ह्यात अव्वल | पुढारी

नगर : राहाता रुग्णालय ‘कुटुंब’शस्त्रक्रियेत जिल्ह्यात अव्वल

साकुरी : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 25 ग्रामीण रुग्णालयांपैकी सर्वाधिक कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करून राहाता ग्रामीण रुग्णालयाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. या पुरस्काराने राहाता तालुक्यात आणखी एक गौरवशाली मानाचा तुरा रोवला आहे.

ऑर्थोपेडिक सर्जन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकूळ घोगरे यांनी टीमच्या साथीने राहाता ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया करून जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालयांसमोर आदर्श ठेवल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत केले. सन 2021-22 या कालावधीत जिल्ह्यात कुटुंब नियोजनाच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्याबद्दल राहाता ग्रामीण रुग्णालयास हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 25 ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक नुकतीच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णीमा बांगर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकूळ घोगरे यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयातील सहकारी डॉक्टर, तसेच आरोग्य सेवक परिचारिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांनी उत्कृष्टपणे काम करून मागील वर्षी एप्रिल ते मार्च या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सुमारे 130 कुटुंब नियोजनाच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.

ग्रामीण रुग्णालयातील सहकारी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांचे हे सामूहिक यश आहे. सर्वांनी अत्यंत प्रामाणिकपणे रुग्णसेवा देण्याचे काम केले आहे. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम व कुटुंब नियोजनाचे फायदे या संदर्भातील जनजागृती अत्यंत प्रभावीपणे करून रुग्णांना शासनाच्या सर्व सोयी-सुविधा व दर्जेदार उपचार दिल्यानेच आम्ही रुग्णांचा विश्वास संपादन करीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करू शकलो.

                                – डॉ. गोकूळ घोगरे, वैद्यकीय अधीक्षक, राहाता ग्रामीण रुग्णालय.

 

Back to top button