नगर : जनावरांची वाहतूक; दोघांना अटक | पुढारी

नगर : जनावरांची वाहतूक; दोघांना अटक

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : दहा गोवंश जनावरांची वाहतूक करणार्‍या दोन्ही वाहनचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. संगमनेर शहर पोलिस पथकाने जोर्वे रस्त्यावर फादरवाडी परिसरात नाकाबंदी करून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या दोन वाहनांतून जनावरे ताब्यात घेतले होते. दरम्यान, कत्तलखाना चालक मात्र पसार झाले आहेत. गोवंश जनावरे पांजरपोळमध्ये ठेवण्यात आली आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले की, आषाढी एकादशीच्या दिवशी भारतनगरमधील कत्तलखान्यांमध्ये कत्तलीसाठी काही गोवंश जनावरे आणली जाणार असल्याची गुप्त माहिती खबर्‍यामार्फत पो. नि. मुकुंद देशमुख यांना समजली. त्यानुसार संगमनेर शहर पोलिसांनी नाकाबंदी करून एक पिकअप जीप व छोटा हत्ती या दोन्ही वाहनांतील लहान-मोठी दहा जनावरे पकडली. या जनावरांची रवानगी सायखिंडीच्या पांजरापोळमध्ये केली. दोन्ही वाहनांसह त्यांच्या चालकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

पोलिस नाईक गजानन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी महंमद अलीम कुरेशी (रा. मोगलपुरा) , सलिम ऊर्फ सोनू कुरेशी (रा. संगमनेर) या दोन कत्तलखाना मालकांसह वाहन चालक गणेश दगडू कदम (वय 32, रा. करुले) व परवेज याकूब कुरेशी (वय 30, रा. भारतनगर) या चौघांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या सुधारित कलमांसह प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्‍या कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत दोघा वाहनचालकांना अटक केली आहे.

महावीर जयंती, आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी कोणत्याही जनावरांची कत्तल करू नये. उघड्यावर मांस विक्री करू नये, यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जाते. दरम्यान, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्राण्यांची कत्तल केली जावू नये, असा प्रघात असताना जनावरांची कत्तलीचा प्रयत्न झाला.

Back to top button