नगर : सरासरी ओलांडूनही 26 टँकर सुरुच | पुढारी

नगर : सरासरी ओलांडूनही 26 टँकर सुरुच

नगर : पुढारी वृत्तसेवा : पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली असून, जिल्ह्यात सरासरी 115.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. मात्र, अद्यापि काही महसूल मंडलांत दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, नगर तालुक्यातील दोन, पारनेर तालुक्यातील सहा, शेवगाव व अकोले तालुक्यातील प्रत्येकी एक अशा दहा गावांतील भूजलपातळी वाढली. त्यामुळे या टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला. त्यामुळे 3 टँकर बंद करण्यात आले. उर्वरित 42 गावे आणि 127 वाड्यांतील पाणीटंचाई परिस्थिती कायम आहे. त्यामुळे 26 टँकर सुरूच आहेत.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 448.1 मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. त्यानुसार जून महिन्यात सरासरी 108 मि. मी. पाऊस ग्रहीत धरला आहे. रोहिणी नक्षत्र कोरडेठाक गेले. त्यामुळे मृग नक्षत्राकडून मोठी अपेक्षित होती. मात्र या नक्षत्रात सर्वदूर दमदार पावसाची नोंद झाली नाही. सरासरी फक्त 44.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात ११५ मि.मि. पाऊस

दि. 22 जूनपासून आर्द्रा नक्षत्र सुरु झाले. या नक्षत्रात आठ दिवसांत सरासरी 69 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी एकूण 115 मि.मी. पाऊस झाला आहे. या महिन्यात पाथर्डी तालुक्यात 155.3 मि.मी., नेवासा 137.4, अकोले 126.3 मि.मी. पाऊस झाला आहे. नगर तालुक्यात 115 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यातील 8 गावे व 29 वाड्यात पाणीटंचाई होती. पावसामुळे 2 गावांत पाणीपातळी वाढली आहे. पारनेर तालुक्यात 18 गावे व 58 वाड्यांत पाणीटंचाई आहे. पावसामुळे या तालुक्यातील 6 गावे आणि 22 वाड्यांत पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे या तालुक्यात आता 12 गावे आणि 36 वाड्यात पाणीटंचाई कायम आहे. शेवगाव तालुक्यात पाऊस झाल्याने येथील एका गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. त्यामुळे या पावसामुळे टंचाईग्रस्त 10 गावे आणि 22 वाड्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे तीन टँकर बंद झाले आहेत.

मात्र, जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची नोंद अद्यापि झाली नाही. त्यामुळे भूजलपातळी देखील वाढण्यास मदत झालेली नाही. त्यामुळे नगर तालुक्यातील 6 गावे, 14 वाड्या, पारनेर तालुक्यातील 12 गावे व 36 वाड्या, संगमनेर तालुक्यात 20 गावे व 46 वाडया, श्रीगोंदा तालुक्यात 2 गावे व 16 वाड्या अशा एकूण 42 गावे आणि 127 वाड्यांत पाणीटंचाई परिस्थिती कायम आहे. त्यामुळे येथील 61 हजार 127 या टंचाईग्रस्त गावांसाठी 26 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुकानिहाय एकूण पाऊस (मि.मी.)

नगर 115, पारनेर 109.8, श्रीगोंदा 100, कर्जत 55.4, जामखेड 112.6, शेवगाव 126.6, पाथर्डी 155.3, नेवासा 140.9, राहुरी 126.4, संगमनेर 127.3, अकोले 126.8, कोपरगाव 86.1, श्रीरामपूर 116.9, राहाता 96.5.

Back to top button