नगर : ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित केले 59 दिवसांत पूर्ण | पुढारी

नगर : ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित केले 59 दिवसांत पूर्ण

सोनई : पुढारी वृत्तसेवा : नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्था व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्तलेखन उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. सोनई येथील आप्पासाहेब सखाराम निमसे यांनी 59 दिवसात हस्तलिखित ज्ञानेश्वरी पूर्ण करून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानकडे जमा केली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त भास्करगिरी महाराज व तत्कालीन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. एक वर्षात लिहून हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण करायचा आहे. रोज किमान 30 ओव्या लिहून पूर्ण करणे बंधनकारक आहे. तालुक्यातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. आता या वह्या जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

या उपक्रमात तालुक्यातील तरुण मुले-मुली, भाविकांनी, वारकरी संप्रदायाच्या ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने लिखाणास सुरुवात केली. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रथम 750 वह्या देण्यात आल्या. भाविकांचा वाढता प्रतिसाद बघता आणखी 610 वह्या उपलब्ध करून दिल्या आहेत. याबद्दल वारकरी संप्रदायाने त्यांचे आभार मानले. या या उपक्रमाचे नेवासा तालुक्यातील कौतुक होत आहे.

Back to top button