नगर : नेवासा, पारनेर तालुक्यांत बिबट्यांचा धुडगूस | पुढारी

नगर : नेवासा, पारनेर तालुक्यांत बिबट्यांचा धुडगूस

पिंपरी जलसेन : पुढारी वृत्तसेवा :  परिसरात बुधवारी रात्री रिमझिम पावसात बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये चार मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे घडली.
पिंपरी जलसेन येथील शेतकरी मच्छिंद्र नानाभाऊ शेळके आपल्या शेळ्या व मेंढ्यासह काळेवस्तीनजीक शेतात रात्रीच्या मुक्कामास होते.

बुधवारी सांयकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. पहाटेपर्यंत ही रिमझिम सुरूच राहिली. रिमझिम पावसाने शेतकर्‍यांचे पाळीव कुत्रे ही आडोशाला बसले असल्याने वन्य प्राण्याने या कळपावर हल्ला केला. शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने कुत्रे भुकायला लागले. हा प्रकार शेतकर्‍यांच्या लक्षात आला.

अंधार असल्याने हल्ला करणारा वन्य प्राणी हा बिबट्या असल्याचे शेतकर्‍याच्या निदर्शनास आले. यामध्ये पाच पाळीव मेंढ्या जखमी झाल्याने मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे अंदाजे 30 ते 35 हजारांची नुकसान झाले असून, तातडीने शासनस्तरावरून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. झावरे व वनविभागाचे अधिकार्‍यांनी भेट देऊन पंचनामा केला.

एकीकडे पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांनी जोडधंदा म्हणून व्यवसाय करत असताना शेतकर्‍यांवर, असे अस्मानी संकट पडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी सरपंच सुरेश काळे यांनी व्यक्त केली.

हनुमाननगर परिसरात सहा शेळ्यांवर हल्ला

नेवासा तालुक्यातील पाथरवाला हनुमाननगर परिसरात बिबट्याने तीन वस्तीवरील चार शेळ्या व दोन बोकडांवर हल्ला केला. यात दोन शेळ्या, दोन बोकडांचा मृत्यू झाले आहे. तर, दोन शेळ्या गंभीर जखमी आहेत. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास रामहरी पांडुरंग खाटीक यांच्या गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने आचानक हल्ला केला.

या हल्यात एक बोकड मृत्यू झाला, यानंतर माजी उपसरपंच रमेश तुळशीराम खाटीक यांच्या गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला केला. यात शेळी व बोकडाचा मृत्यू झाला. दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर पहाटे मनोहर रावसाहेब थोरे यांच्या गोठ्यातील एक शेळी शेजारच्या ऊसात मृत अवस्थेत आढळून आली.

एकाच रात्री दोन तीन ठिकाणच्या वस्तीवरून शेळ्यांचा फाडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी पाथरवाल्याचे सरपंच हरीभाऊ थोरे, उपसरपंच रमेश खाटीक, दत्तात्रय खाटीक, रामनाथ खाटीक, सत्यवान खाटीक, सरपंच कपुरचंद कर्डिले, ग्रामपंचायत सदस्य राजहंस मंडलिक आदींनी केली.

Back to top button