नगर: बारा जलाशयांची पोटं खपाटीला, चिंतेचे ढग कायम; वरूणराजाच्या आगमनाकडे नजरा | पुढारी

नगर: बारा जलाशयांची पोटं खपाटीला, चिंतेचे ढग कायम; वरूणराजाच्या आगमनाकडे नजरा

नगर: पुढारी वृत्तसेवा: यंदाही वेळेवर मान्सूनचे आगमन होईल, या आशेवर शेतकर्‍यांनी खरिपाची तयारी केली होती. मात्र, रोहीणी गेल्या, मृगही कोरडा गेला, तरीही अद्याप वरूणराजाचे दमदार आगमन होताना दिसत नाही. त्यात, दुसरीकडे धरणांतील पाणीसाठाही दररोज खालावत असल्याने शेतकरी चिंतेत सापडल्याचे दिसत आहे. भंडारदरा धरणात गेल्यावर्षी 19 जून 2021 रोजी 45.63 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तर, यंदा अजूनही पाऊस न झाल्यासे सध्या 2513 दलघफू इतका 22 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा निळवंडेत पाणी समाधानकारक असले, तरीही दररोज झपाट्याने कमी होणारा पाणीसाठा, आवर्तनाची सुरू असलेली मागणी, आणि लांबलेला पाऊस, यामुळे भविष्यात पाण्याची समस्या जाणवू शकते. कालअखेर निळवंडेत 45 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यावर किमान 44 दिवसांपेक्षा अधिक काळ शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन शक्य होणार असल्याचा अंदाज आहे. मुळा धरणात गेल्यावर्षीप्रमाणेच पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी 19 जून अखेर धरणात 17.10 टक्के पाणी होते, तर आज 3956 दलघफू पाणी शिल्लक असून हा उपयुक्त साठा 18.40 टक्के इतका आहे.

आढळा धरणात सध्या 339 दलघफू, मांडओहोळ 62.35, घा.पारगाव 87, घोड 1094, सीना 907, खैरी 92.16, विसापूर 33.66, मुसळवाडी 66.25 आणि टाकळीभान 118 दलघफू पाणी शेती व पिण्यासाठी उपयुक्त आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यातील सर्व 12 जलाशयांपैकी काही प्रकल्पात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर काही ठिकाणी गतवर्षीपेक्षा थोडासा दिलासा देणारा पाणीसाठा दिसत आहे. मात्र, जर पाऊस आणखी लांबला तर शेतीपिकांबरोबरच पिण्याचा पाणीप्रश्नही गंभीर होण्याची भीती आहेच.

यावर्षी कमी पाणीसाठा
गेल्यावर्षी 19 जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 12 प्रकल्पांमध्ये 11086 दलघफू पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी मात्र काहीसा हा साठा कमी दिसत आहे. यावर्षी सर्व प्रकल्पांत मिळून 10,850 इतका पाणीसाठा उपलब्ध दिसत आहे. हा पाणीसाठी समाधानकारक दिसत असला, तरीही चिंता मात्र कायम आहे.

परिणितीची स्वच्छता मोहीम

गेल्यावर्षी 1118, यंदा 339 मि.मी. पाऊस
गेल्यावर्षी 1 ते 19 जून 2021 दरम्यान भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, मांडओहोळ, घा.पारगाव, घोड, सीना, खैरी, विसापूर, मुसळवाडी, टाकळीभान प्रकल्पांअंतर्गत 1118 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. यामध्ये भंडारदरा पाणलोटात सर्वाधिक 226, घोड व सीना लाभक्षेत्रात 136 मि.मी. इतका पाऊस पडलेला होता. निळवंडे 122 आणि मुळा लाभक्षेत्रात 48 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मात्र, 1 ते 19 जून या कालावधीत अवघा 339 मि.मी. पाऊस पडला असून, यामध्ये निळवंडे सर्वाधिक 94, भंडारदरा 46, पारगाव 75, मुळा अवघा 26 मि.मी. पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून समजली असून, ती चिंताजनक आहे.

प्रकल्पाची तुलनात्मक स्थिती
भंडारदरा – 20.61 टक्के
साठा – 11039 (दलघफू)
सध्या पाणी – 2513
गेल्या वर्षी – 4903

घोड – 18.30 टक्के
साठा – 5179 (दलघफू)
सध्या पाणी – 1094
गेल्या वर्षी – 1293

आढळा – 34.77 टक्के
साठा – 1060 (दलघफू)
सध्या पाणी – 339
गेल्या वर्षी – 383

मुळा – 18.40 टक्के
साठा – 26000 (दलघफू)
सध्या पाणी – 3956
गेल्या वर्षी – 3678

निळवंडे – 45.61 टक्के
साठा – 8320 (दलघफू)
सध्या पाणी – 3934
गेल्या वर्षी – 1123

सीना – 19.17 टक्के
साठा – 2400 (दलघफू)
सध्या पाणी – 354
गेल्या वर्षी – 276

हेही वाचा

फडणवीस मुख्यमंत्री, मला उपमुख्यमंत्री करा : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला प्रस्ताव

Nashik Crime : सातपूरला सराफाचे दुकान फोडले

परिणितीची स्वच्छता मोहीम

Back to top button