

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
लव्हाटेनगर येथील तीन महिन्यांपूर्वी घरातील महिलांसह लहान मुलांना चाकूचा धाक दाखवत भरदिवसा टाकलेल्या सशस्त्र दरोड्यासह इतर घरफोड्यांच्या तपासाचा छडा लावण्यात अपयशी ठरलेल्या सातपूर पोलिसांना दरोडेखोरांनी पुन्हा चांगलाच झटका दिला आहे. शनिवारी (दि. 18) मध्यरात्री श्रमिकनगर येथील श्रीहरी ज्वेलर्स सराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी सव्वादोन किलो चांदी लंपास केली. सुदैवाने तिजोरी फोडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने सोन्याचे दागिने मात्र त्यांच्या हाती लागले नाही.
पांडुरंग शहाणे (रा. ध—ुवनगर, शिवाजीनगर) यांचे श्रमिकनगर येथील हनुमान मंदिर परिसरात श्रीहरी ज्वेलर्स दुकान शनिवारी (दि. 18) नेहमीप्रमाणे बंद करून ते घरी गेले. रविवारी (दि. 19) सकाळी दुकानाचे शटर तोडलेले दिसल्याचे नागरिकांनी त्यांना कळवले. शहाणे यांनी त्वरित सातपूर पोलिसांना दुकानातील सव्वादोन किलो चांदीचे घडवलेले ऐवज व इतर किरकोळ साहित्य चोरीस गेल्याची माहिती दिली. या वेळी पोलिसांच्या तपासात दुकानातील तिजोरी ही छनी व हातोडीने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. सातपूर ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे.