183 युजर्सची ऑनलाईन झाली फसवणूक सायबर चोरटे सक्रिय | पुढारी

183 युजर्सची ऑनलाईन झाली फसवणूक सायबर चोरटे सक्रिय

 श्रीकांत राऊत

नगर : अँड्रॉईड फोन वापरण्याचे फायदे जितके, तितकेच तोटेही असल्याची बाब समोर आली आहे. अँड्रॉईड फोन युर्जसला वेगवेगळे आमिषं, क्लृप्त्या काढत आर्थिक फसवणूकीचे प्रमाण वाढत असून सायबर चोरटे पाच महिन्यात 183 नगरकरांच्या पैशावर डल्लामारी केली आहे. फसवणूक झालेल्या युजर्सनी सायबर शाखेकडे तक्रार अर्ज दिले असून पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे.

अँड्रॉईड फोन वापर सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर पडले आहेत. अत्याधुनिक युगात प्रत्येकाकडे अँड्रॉईड फोन असून विविध अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केले जातात. ज्यामध्ये फोन पे, गूगल पे, पे टीएम आदींचा समावेश आहे. सायबर गुन्हेगारांच्या फोनवरील आमिषाला उच्च शिक्षितही बळी पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. जानेवारी ते मे 2022 या पाच महिन्यात 183 जणांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

सायरबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून चोरटे विविध क्लृप्त्या वापरून अनेकांना आर्थिक गंडा घालत आहेत. आर्थिक विषयक सायबर गुन्ह्यांमध्ये केवायसी अपडेट करण्यासाठी मोबाईलवर आलेली लिंक व ओटीपी हा मुद्दा घातक ठरत आहे. बँकेकडून मिळालेला ओटीपी ग्राहकांना विचारून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण सायबर गुन्हेगार नगरकरांच्या पैशावर डल्लामारी करत आहेत. झटपट कर्ज देणार्‍या शेकडो अ‍ॅपच्या माध्यमातून मोठी आर्थिक फसवणूक होत आहे.

तत्काळ कर्जाच्या नावाखाली बँकेची कागदपत्रे मागून खात्यातून पैसे वळविण्यात येतात. अ‍ॅप इंन्स्टॉल केल्यानंतर मोबाईलची स्क्रीन सायबर चोरांना दिसते. त्याद्वारे बँकेचा आलेला ओटीपी घेऊन फसवणूक केली जाते.

कार्ड एक्सपायरीचा बहाणा
डेबिट-क्रेडिट कार्ड एक्सपायर होत आहे. कार्ड सुरू ठेवण्यासाठी मेसेज पाठविण्यात येईल. त्यावरील लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरण्यात यावी, असे सायबर गुन्हेगारांकडून सांगण्यात येते. त्यानंतर काही वेळात बँक खात्यातून पैसे गायब झाल्याचे मेसेज प्राप्त झाल्याच्या तक्रारी सायबर पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

केवायसीच्या नावाखाली फसवणूक
तुमच्या बँक खात्यावरील व्यवहार सूरू ठेवण्यासाठी केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्डची माहिती तसेच बँकेचा अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर विचारण्यात येतो.

गुन्हेगार दिल्ली, पश्चिम बंगालचे
बहुतांश सायबर गुन्हेगार हे दिल्ली, पश्चिम बंगाल भागातील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांना वेळ लागतो. आरोपींचा शोध घेण्यासाठी नगर पोलिसांनी अनेकदा दिल्ली, पश्चिम बंगालच्या वार्‍या केल्या आहेत.

आर्थिक फसवणुकितील गुन्ह्यांच्या तपासासाठी दोन पथके दिल्ली, पश्चिम बंगालला रवाना करण्यात आली आहेत. बहुंताश आरोपी दुसर्‍या राज्यातील असतात. त्यादिशेने सायबर पोलीस तपास करत असतात.
ज्ञानेश्वर भोसले,
पोलिस निरीक्षक,
सायबर गुुन्हे शाखा.

Back to top button