MLA P N Patil | आमदार पी. एन. पाटील : पक्षनिष्ठेचा मानदंड आणि झंझावती राजकीय प्रवास | पुढारी

MLA P N Patil | आमदार पी. एन. पाटील : पक्षनिष्ठेचा मानदंड आणि झंझावती राजकीय प्रवास

शिरोली दुमाला : युवराज पाटील

कितीही संकटे आली तरी आपल्या पक्षविचारापासून तसूभरही बाजूला न जाता काँग्रेस पक्षाचा झेंडा संघर्षमय राजकीय जीवनात तितक्याच ताकदीने डौलाने फडकविण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पी.एन.पाटील-सडोलीकर (MLA P N Patil) यांनी केले. चार दशकांचा त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास हा झंझावती असाच राहिला आहे. काँग्रेसचा पक्षनिष्ठ मानदंड हरपल्याने समस्त काँग्रेसजन पोरका झाला आहे.

सत्तेच्या व पदाच्या लालसेपोटी, स्वहितासाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्षीय विचार पायदळी तुडवून कोलांटी उड्या मारणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशा घटना ज्या-ज्या वेळी घडतात त्या-त्या वेळी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या काही नेत्यांची नावे जनमाणसांतून घेतली जातात. त्यामध्ये काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील (MLA P N Patil) यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने ते एक ‘पक्षनिष्ठेचा मानदंड’ ठरतात.

आमदार पी. एन. पाटील (MLA P N Patil) यांनी जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदापासून काम केले. पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा खऱ्या अर्थाने १९८५ मध्ये केडीसीसी बँकेची पहिली निवडणूक लढवून झाला.१९९०-१९९५ मध्ये केडीसीसी बँकेचे चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे आजही शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या नावाचा ठसा खोलवर रुजला आहे. गांधी – नेहरू घराण्यांवर निष्ठा ठेवून तन – मन- धन अर्पूण १९ -२० वर्षे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद आमदार पाटील यांनी सक्षमपणे सांभाळले. दोन वर्षे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्यानंतर सर्वाधिक काळ जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला आहे.

आमदार पाटील यांचा संपूर्ण राजकीय प्रवास हा संघर्षमय असा राहिला. त्यांनी विधानसभेच्या सहा निवडणुका लढवल्या. पहिल्या तीन विधानसभा निवडणुका पी. एन. पाटील विरुद्ध शेकापचे संपतराव पवार पाटील अशा झाल्या. यातील १९९५ व १९९९ या दोन निवडणुकीत पी एन पाटील यांचा निसटता पराभव झाला. पुढे २००४ च्या तिसऱ्या निवडणुकीत मात्र त्यांनी ४४ हजार ९९७ मतांनी दणदणीत विजय मिळवून ते सांगरूळ विधानसभा मतदारसंघाचे पहिल्यांदा आमदार झाले.

त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना होऊन करवीर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. पुढे पी एन पाटील विरुद्ध शिवसेनेचे चंद्रदीप नरके अशा निवडणुका झाल्या. यामध्ये २००९ व २०१४ च्या निवडणूकीत आम. पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २०१९ च्या निवडणुकीत पाटील २२,६६१ मतांनी पुन्हा दणदणीत विजय मिळवून आमदार झाले. नुकत्याच झालेल्या भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी सर्वांनाच दिसून आली.

१९९९ साली राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हा जिल्ह्यातील अनेक मातब्बर मंडळी राष्ट्रवादीत गेली. काँग्रेसची अवस्था बिकट अशी होती. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पी. एन. पाटील यांनी अत्यंत सक्षमपणे चालवून पक्षाला जिल्ह्यात उभारी दिली. सांगरुळ विधानसभेचे आमदार म्हणून निवड झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी नक्की होती. मात्र अत्यंत जवळचे मित्र असल्यानेच निर्माण झालेल्या राजकीय अपरिहार्यतेमुळे विलासरावांनाही जवळच्या मित्रालाच थांबवावे लागले. पुढेही आमदार पाटील यांना मंत्री पदाने हुलकावणी दिली.

२०१९ मध्ये तर मंत्रीपद मिळाले नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीच, शिवाय पक्ष सोडावा अशी भाषाही वापरली. मात्र तरीही आमदार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात ठासविले आणि कार्यकर्त्यांना शांत केले. काँग्रेस पक्ष सोडून काहीही करायचे नाही हे पक्के ठासविले. राजकीय वाटचालीत त्यांना इतर पक्षाकडून अनेकवेळा मंत्रीपदाच्या ऑफर येत होत्या, मात्र कधीही त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून विचार केला नाही.

अनेक राजकीय चढ – उतार आले, मंत्री पदाने हुलकावणी दिली तरीही काँग्रेस पक्षावरील आपले प्रेम व निष्ठा जराही ढळू न देता अखेरपर्यंत काँग्रेस विचारांचा पाईक म्हणूनच राहण्याचा त्यांचा निर्धार काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी व आदर्शवत असाच आहे.

हेही वाचा : 

Back to top button