धुळे : वखारीला आग लागल्याने लाखो रुपयांची लाकडे जळून खाक | पुढारी

धुळे : वखारीला आग लागल्याने लाखो रुपयांची लाकडे जळून खाक

धुळे : पुढारी वृत्तसेवा
शहरातील ८० फुटी रोड लगत असणाऱ्या लाकडाच्या वखारीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रस्ता कामासाठी डांबर गरम करत असताना ठेकेदाराने निष्काळपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नगरसेवक शवाल अन्सारी यांनी केला आहे.

धुळे शहरातील ८० फुटी रस्त्याच्या लगत लाकडाची वखार लावण्यात आलेली आहे. या वखारीला गुरुवारी (दि.२) दुपारी अचानक आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला ही माहिती तत्काळ देण्यात आल्याने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. लाकडाची वखार असल्याने आगीत लाखो रुपयांची लाकडे जळून खाक झाली. उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परीसरात नागरिकांनी गर्दी झाली केली होती. तर माजी उपमहापौर शवाल अन्सारी यांनी देखील कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धावपळ केली. अन्सारी यांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याची बाब अधोरेखित केली. धुळे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढला. मात्र त्या तुलनेत अग्निशमन दलाचा विकासामध्ये कमतरता दिसून येते. महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु असून या संदर्भात आयुक्त आणि प्रशासनाने तातडीने दखल घेतली पाहिजे. यापुढे अशा प्रकारची घटना झाल्यास महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासन यांनाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा:

Back to top button