याेगी आदित्‍यनाथ (संग्रहित छायाचित्र)
याेगी आदित्‍यनाथ (संग्रहित छायाचित्र)

संस्कृतीवर घाला घालणार्‍या काँग्रेसचा नायनाट करा : योगी आदित्यनाथ

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : 'सब का साथ, सब का विकास' ही रामराज्याची विचारधारा घेऊन एनडीए काम करीत आहे. तीच विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच पवित्र भूमीतून मुघल साम्राज्य नेस्तनाबूत करण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीवर घाला घालणार्‍यांचा नायनाट करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश येथे करून राम मंदिराची स्थापना केली. आपली संस्कृती जपण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. त्यामुळे खोटे बोलणार्‍या, देशाला असुरक्षित करणार्‍या काँग्रेस पक्षाला कधीही साथ देऊ नका. गेल्या 70 वर्षांत काँग्रेसमुळे देशाची अधोगती झाली, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. ते इचलकरंजी येथील थोरात चौकात हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसने गरिबी हटावसाठी वारसा कर लादणार असल्याचे सांगितले. हा वारसा कर म्हणजे सर्वसामान्यांच्या संपत्तीतील निम्मी रक्कम सरकार काढून घेणार आहे. हा जिझिया कर कधीही मान्य होणार नाही. काँग्रेस सर्वसामान्यांकडून संपत्ती काढून घेत आहे; तर मोदी सरकार गोरगरीब जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये शेतकर्‍यांसाठी योजना, महिलांसाठी गॅस योजना, घरकूल आवास, शौचालय उभारणी आदींबरोबरच महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी यांच्या कर्तृत्वामुळे देशभर चांगल्या रस्त्यांचे जाळे विणले आहे. रेल्वेचे जाळे, आयआयटी सेंटर आदींसह सर्वच क्षेत्रात मोदी सरकारने दहा वर्षांत चांगले काम केले आहे.

राम मंदिर बनविण्याची घोषणा ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, तेव्हा विरोधक म्हणाले, उत्तर प्रदेशात रक्ताचे पाट वाहतील. परंतु, आम्ही राम मंदिर उभारून रक्ताची नव्हे, तर रंगाची होळी साजरी केली. मागच्या 10 वर्षांत भारतातील सीमा सुरक्षित झाल्या आहेत. हा नवीन भारत आहे दुष्मनांना सोडत नाही. हा काँग्रेसच्या जमान्यातील भारत नव्हे. यापूर्वी मुंबईमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करून अनेक भारतीयांचे प्राण घेतले. त्यावेळी असणार्‍या काँग्रेस सरकारने पाकिस्तानविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. परंतु गेल्या दहा वर्षांत पाकिस्तानची हल्ला करण्याची हिंमत झाली नाही.

एखादा फटाका मोठ्याने वाजला, तरी पाकिस्तान आम्ही फोडला नसल्याचा खुलासा करते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. उत्तर प्रदेशातील 80 जागा आम्ही जिंकणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागा जिंकून पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करा, असे आवाहन करून अब की बार पुन्हा मोदी सरकार आणूया, असे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केले. योगी आदित्यनाथ सभास्थळी आल्यानंतर त्यांचे तलवार देऊन स्वागत करण्यात आले. सभा संपल्यानंतर त्यांना स्वामी समर्थांची मूर्ती प्रदान करण्यात आली.

खासदार धैर्यशील माने यांनी हिंदीतून भाषण केले. ते म्हणाले, इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग व पाणी प्रश्न हे दोन मोठे विषय आहेत. शहरासाठी पाणी योजना मीच मंजूर करून आणली असून मीच इचलकरंजीला पाणी देणार. मी शहराला पाणी देऊ शकलो नाही, तर येणार्‍या कोणत्याच निवडणुकीला मी उभारणार नाही. गेल्या पाच वर्षांत कोरोनामुळे काम करण्यास मर्यादा आली. परंतु, त्यानंतर शिंदे सरकार आल्यानंतर गतिमान काम करून कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणण्याचे काम केले. भविष्यात सीईपीटी प्रकल्प राबवून पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, खासदार धैर्यशील माने हे मतदारसंघामध्ये एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. वारंवार ते माझ्याशी यासंदर्भात चर्चा करतात. त्यामुळे या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून निश्चितच विकास झाल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. धनंजय महाडिक, खा. अनिल बोंडे, माजी आ. सुरेश हाळवणकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, मिश्रीलाल जाजू, सुरेश पाटील, विठ्ठल चोपडे आदींची भाषणे झाली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, सत्यजित देशमुख, माजी खा. निवेदिता माने, माजी आ. अमल महाडिक, अशोक स्वामी, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, अमृत भोसले, मनसेचे पुंडलिकराव जाधव आदींसह शिवसेना, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Pudhari News
pudhari.news