Nashik fraud News | जागा विकसीत करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकास २८ कोटींचा गंडा | पुढारी

Nashik fraud News | जागा विकसीत करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकास २८ कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्लॉट विकसीत करण्याच्या बहाण्याने जागा मालकांनी बांधकाम व्यावसायिकास गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विजय जगन्नाथ राठी यांच्यासह इतर आठ जणांविरोधात २८ कोटी १० लाख १२ हजार ४७५ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करीत आहे. पोलिसांनी संशयित विजय राठी यास अटक केली आहे.

विजय के. बेदमुथा (५९, रा. नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी २५ नोव्हेंबर २००८ ते ११ जून २०२३ या कालावधीत फसवणूक केली. राठी कुटूंबियांची गंगापूर रोड परिसरात राठी आमराई म्हणून १ हेक्टर ५४ आर क्षेत्रफळ असलेली जागा आहे. ही जागा विकसीत करण्यासाठी राठी व इतर संशयितांनी बेदमुथा यांच्यासोबत करार केला. त्यानुसार बेदमुथा यांच्यासोबत विकसनाचा व्यवहार झाल्यानंतर राठी यांनी बेदमुथा यांच्याकडून १९ कोटी ४१ लाख ५५ हजार २६९ रुपये घेतले. तर बेदमुथा यांनी जागा विकसीत करण्यासाठी इतर खर्च म्हणून ८ कोटी ६२ लाख ५७ हजार २०६ रुपयांचा खर्च केला. त्यानुसार बेदमुथा यांनी जागा विकसीत करण्यासाठी २८ कोटी १० लाख १२ हजार ४७५ रुपयांचा खर्च केला. दरम्यान, जागा विकसीत न होता संशयितांनी बेदमुथा यांच्या पैशांचा अपहार केला. तसेच याप्रकरणी न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. तरीदेखील राठी कुटूंबियांनी या जागेचा विकसीत करारनामा दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकासोबत केला. ही बाब उघड झाल्यानंतर बेदमुथा यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात विजय राठीसह कौसल्या राठी, सुजाता मंत्री, अर्चना मालानी, श्रुती लड्डा, अदिती अग्रवाल.दिपक राठी, वृंदा राठी,सी. सुशमा काबरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहेत. पोलिसांनी संशयित राठी यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा:

Back to top button