मोशीकरांना खुशखबर ! कचर्‍याचे डोंगर हटणार; दुर्गंधीतून होणार सुटका | पुढारी

मोशीकरांना खुशखबर ! कचर्‍याचे डोंगर हटणार; दुर्गंधीतून होणार सुटका

मिलिंद कांबळे

पिंपरी : चिंचवड शहराचा तब्बल 33 वर्षांपासूनचा कचरा मोशी येथील डेपोत साचून कचर्‍याचे अनेक डोंगर तयार झाले आहेत. येत्या वर्षभरात कचर्‍याचे हे डोंगर हटविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांची दुर्गंधीपासून मुक्तता होणार आहे. तसेच, शुद्ध व ताजी हवा मिळणार आहे. त्यामुळे, परिसरातील सदनिका तसेच, जागेचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
महापालिकेने सन 1991 पासून मोशी येथे कचरा डेपो सुरू केला आहे. तेथील 81 एकर जागेत कचरा साचला आहे. तेव्हापासूनचा कचरा साचल्याने परिसरात चारी बाजूस कचर्याचे अक्षरश: डोंगर तयार झाले आहेत.

त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, उन्हाळ्यात कचरर्‍यास आगी लागण्याचे प्रकार सतत घडतात. डेपोची क्षमता संपत आल्याने कचर्‍याची विल्हेवाट कोठे लावायची, हा प्रश्न महापालिकेसमोर निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने कचर्‍यापासून वीज निर्मिती (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प सुरू केला आहे. दररोज 700 टन सुक्या कचर्‍यापासून प्रत्येक तासाला 14 मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे.

ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत, प्लास्टिक कचर्‍यापासून इंधन तयार होते. तसेच, बायोमायनिंगद्वारे कचर्‍याचे ढीग हटविले जात आहेत. पहिल्या टप्प्यात 8 लाख चौरस मीटर कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. आता, दुसर्‍या टप्प्यात 15 लाख चौरस मीटर कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे. ते काम मार्च 2025 ला संपणार आहे. डेपोतील कचर्‍याचे सर्व डोंगर हटविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 25 एकर जागा रिकामी होणार आहे.

कचरा त्याच दिवशी संपणार

महापालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे दररोजच्या कचर्‍याची विल्हेवाट लागल्याने डेपोत अनेक दिवसांचा कचरा शिल्लक राहणार नाही. कचरा समस्येतून महापालिकेची सुटका होणार आहे. डेपोच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून कचर्‍यापासून निर्माण होणारी दुर्गंधी बंद होणार आहे.

भविष्यात कचरा मोठ्या प्रमाणात वाढणार

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे आहे. ती झपाट्याने वाढत आहे. देहूरोड व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा महापालिका घेते. तसेच, भविष्यात काही नगरपालिकांचाही कचरा महापालिकेस घ्यावा लागणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत हिंजवडी, माण, मारुंंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा तसेच, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील लोकवस्तीचा समावेश करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा वाढणार आहे. सध्या दररोज 1 हजार 250 टन ओला व सुका कचरा जमा होत आहे.

800 टन सुक्या कचर्‍याची विल्हेवाट लावणार

वेस्ट टू एनर्जी प्रमाणे आणखी नवा प्रकल्प डेपोत सुरू करण्याचे नियोजन आहे. वेस्ट टू एनर्जी की हायड्रोजन गॅस निर्मिती प्रकल्प राबवायचा, याची पडताळणी करून आराखडा तयार करण्याचे काम पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून सुरू आहे. त्या प्रकल्पात दररोज 500 ते 800 टन सुका कचर्‍याची विल्हेवाट लागणार आहे. हायड्रोजन गॅस निर्मिती प्रकल्प हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

हेही वाचा

Back to top button