उष्णतेने हैरान; राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता.. | पुढारी

उष्णतेने हैरान; राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून, बहुतांश शहरांचे तापमान 40 अंशांच्या पुढे पोहचले आहे. अकोल्यामध्ये बुधवारी (दि.27) राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, बीड, जालना, नांदेड, परभणी, यवतमाळ, लातूर, धाराशिव, सोलापूर, नागपूर, वर्धा, बुलडाणा, ब्रह्मपुरी, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर यांसह बहुतांश शहरांचे तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. दरम्यान, 30 मार्चला विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

कर्नाटकच्या राज्याच्या अंतर्गत भागापासून ते पूर्व विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती सुरू आहे. या स्थितीमुळे 30 मार्चच्या आसपास विदर्भात अवकाळी पाऊस वादळी वारे, विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जनेसह हजेरी लावणार आहे.
याबरोबरच उत्तर भारतातील राजस्थानमध्ये देखील द्रोणीय स्थिती कार्यरत आहे. तर हिमालयीन भागात गारपीट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

असे असले तरी उत्तर भारताबरोबरच दक्षिण भारतातून राज्याकडे उष्ण वारे वाहू लागले आहेत. या वाऱ्यामुळेच राज्यात उष्णतेचा कहर झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर- मध्य महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागात तीव्र उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. अगदी सकाळपासूनच उन्हाचा कडका जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिक सकाळीच शेतातील अगर इतर कामे उरकत आहेत. दुपारी तर उन्हाचा तडाखा जबरदस्त बसत असून, तीव्र उन्हामुळे उकाडा देखील तेवढाच तेज झाला आहे. कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे राज्य होरपळून निघण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात बुधवारी नोंदलेले कमाल तापमान

मुंबई – 31.4, अलिबाग- 30, रत्नागिरी- 32.2, डहाणू- 32.6, पुणे- 39, लोहगाव- 40, जळगाव- 40, कोल्हापूर- 38.2, महाबळेश्वर- 33.3, मालेगाव- 41, नाशिक- 39.8, सांगली- 38.7, सातारा- 38.9, सोलापूर- 41.4, छत्रपती संभाजीनगर- 39.5, परभणी- 40.8, नांदेड- 39.8, बीड- 40.3, अकोला- 41.5, अमरावती- 40.4, बुलडाणा- 40.2, ब—ह्मपुरी- 40.1, चंद्रपूर- 38.6, गोंदिया- 38, नागपूर- 39, वाशिम- 41.3, वर्धा- 40.5.

  • उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता
  • विदर्भात 30 मार्चला वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता
  • जळगाव, नाशिक, बीड, जालना, नांदेड, परभणी, यवतमाळ, लातूर, धाराशिव, सोलापूर तापले

हेही वाचा

Back to top button