Nashik Civil Hospital | शासकीय रुग्णालयाला पालकमंत्र्यांची अचानक भेट; सिव्हीमधला कारभार ‘राम भरोसे’ | पुढारी

Nashik Civil Hospital | शासकीय रुग्णालयाला पालकमंत्र्यांची अचानक भेट; सिव्हीमधला कारभार 'राम भरोसे'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दुरावस्था अन् गैरसोयीसाठी कुपरिचित असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक केलेल्या पाहणी दौऱ्यात, हेच चित्र दिसून आल्याने जिल्हा रुग्णालय गैरसोयीचे असल्याच्या रुग्णांच्या तक्रारींवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाला आहे. लिफ्ट बंद, रुग्ण इतरत्र अन् अंधारातून मार्ग काढत पालकमंत्र्यांनी हा धावता दौरा केला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी रुग्णालयात केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तो वस्तुस्थितीशी निगडीत नसल्याने त्यांचा प्रयत्न केविलवाणा ठरल्याचे दिसून आले.

जिल्हा रुग्णालय अन् रुग्णांची गैरसोय हे एकप्रकारे समीकरणच झाले आहे. मात्र, सरकारतर्फे जिल्हा रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्याच्या वल्गना केल्या जात असल्याने अन् देशभरातील तब्बल ७५ जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुंपातर केले जाणार असल्याने जिल्हा रुग्णालये कात टाकतील अशी सर्वसामान्यांची भावना आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा रुग्णालयाचा धावता दौरा केला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला. तसेच रुग्णांशी संवाद साधून त्यांच्यावर योग्य उपचार केले जावेत अशा डॉक्टरांना सूचना दिल्या. दरम्यान, या पाहणी दौऱ्यादरम्यान रुग्णालयातील गैरसोयीचे पुन्हा एकदा दर्शन दिसून आले. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कॅबिनबाहेरच रुग्णांच्या नातेवाईकांनी पालकमंत्र्यांना गाठत तक्रारी अन् अपेक्षांचा पाढा वाचला. रुग्णालयातील बऱ्याच भागात बसविलेले ट्यूबलाइट बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले, पालकमंत्र्यांनी दोनदा लिफ्टने जाण्याचा विचार केला, मात्र लिफ्ट बंद असल्याने त्यांनी जीन्यातून वेगवेगळ्या विभागाला भेटी देणे पसंत केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी रुग्णालयात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच आगामी काळात आणखी काय उपाययोजना केल्या जातील याविषयी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जुन्या साहित्यांना दुरुस्तीचा डोस
जिल्हा रुग्णालयाची इमारत जुनी झाली असून, प्रारंभी केलेल्या सोयीसुविधांवरच रुग्णसेवा केली जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी स्वत:च याबाबीला दुजोरा दिला. त्यांनी म्हटले, येथील बेड असो वा अन्य साहित्य त्याचीच दुरुस्ती करून ते साहित्य रुग्णसेवेसाठी वापरले जात आहे. जेणेकरून शासनाच्या पैशांची बचत होईल.

निधीचा विनियोग कसा?
शासकीय जिल्हा रुग्णालयातील देखभाल, दुरुस्तीसाठी तसेच इतर उपाययोजनांसाठी शासनाकडून भरघोस निधी दिला जातो. मात्र, या निधीचा योग्य विनियोग होतो काय? हा खरा प्रश्न आहे. शासनाकडून निधी दिला जात असतानाही जिल्हा रुग्णालयातील सोयीसुविधांवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याने, या निधीचा नेमका विनियोग कसा केला जातो? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button