ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला ; कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस शक्य | पुढारी

ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला ; कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस शक्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने केरळ व तामिळनाडू राज्यात मोठा पाऊस सुरू आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाताची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण असल्याने दिवसा व रात्री कमालीचा उकाडा जाणवत आहे. कमाल व किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. दरम्यान, कोकण व मध्य महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने केरळ व तामिळनाडू या दोन राज्यांत तुफान पाऊस सुरू आहे.

तेथे रविवारी सर्वच ठिकाणी 200 ते 100 मि.मी. इतका पाऊस झाला. तसेच 9 नोव्हेंबरपर्यंत केरळला ऑरेंज, तर तामिळनाडूला यलो अलर्ट दिला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाला. या दोन्हींचा महाराष्ट्रावर परिणाम होत आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने दिवसा कमाल व रात्रीच्या किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. राज्याचे कमाल तापमान 32 ते 33 अंश, तर किमान तापमान 16 ते 21 अंशांवर गेले आहे.

प्रमुख शहरांतील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
नगर 32.2 (20), कोल्हापूर 31 (16.1), महाबळेश्वर 25.8 (16), नाशिक 32.3 (15.5), सांगली 31.5 (23.9), सातारा 31.8 (22.5), सोलापूर 34.2 (21), मुंबई 34.2 (26), छत्रपती संभाजीनगर 31.1 (15.1), परभणी 33.1 (18), अकोला 34 (16.6), बुलडाणा (17.4), चंद्रपूर 32.6 (16.5), गोंदिया 32.6 (17.2).

6 ते 9 नोव्हेंबरपर्यंत हलका पाऊस
या वातावरणामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात 6 ते 9 नोव्हेंबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र उर्वरित राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे राज्यभर आगामी आठवडा उकाडा जाणवेल, असा अंदाज आहे.

हेही वाचा : 

Back to top button