पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 80.52 टक्के मतदान ; आज मतमोजणी | पुढारी

पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 80.52 टक्के मतदान ; आज मतमोजणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील 37 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर उर्वरित 186 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 5) सकाळी साडेसात वाजता 708 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. एकूण 3 लाख 89 हजार 614 मतदारांपैकी 3 लाख 5 हजार 669 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकूण 80.52 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील 2 हजार 42 ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील 851 सदस्य बिनविरोध निवडून आले. 59 जागांसाठी एकही अर्ज आलेला नव्हता. त्यामुळे रविवारी सदस्यपदाच्या 1 हजार 132 जागांसाठी मतदान झाले. सरपंच थेट मतदारांतून निवडला जाणार आहे.

तीन ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज आलेला नव्हता. तर 49 सरपंच बिनविरोध विजयी घोषित झाले. त्यामुळे प्रत्यक्षात 179 सरपंचपदांसाठी मतदान झाले. पहिल्या दोन तासांत म्हणजेच साडेनऊ वाजेपर्यंत 14.55 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुढील दोन तासांत मतदानाला काहीसा वेग आला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 32.56 टक्के इतकी झाली. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत 51.85 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 2 लाख 57 हजार 961 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 66.39 इतकी होती. त्यानंतर सायंकाळी मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.

जिल्ह्यातील मतदार
स्त्री मतदार – 1 लाख 88 हजार 389
पुरुष मतदार – 2 लाख 160
इतर – 06

दर दोन तासांनी झालेले मतदान
– सकाळी साडेसात ते साडेनऊ ः 56 हजार 546 – 14.55 टक्के
– साडेनऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत : 1 लाख 26 हजार 497 – 32.56 टक्के
– साडेअकरा ते दीड वाजेपर्यंत : दोन लाख 699 – 51.56 टक्के
– साडेतीन वाजेपर्यंत : दोन लाख 57 हजार 961 – 66.39 टक्के
– साडेपाच वाजेपर्यंत : 3 लाख 5 हजार 669 – 80.52 टक्के

मतदान झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
आंबेगाव – 30, खेड – 25, इंदापूर – 6, पुरंदर – 15, हवेली – 3, भोर -27, मावळ – 19, बारामती – 32, शिरूर – 8, वेल्हे – 6, जुन्नर -26, दौंड – 11 आणि मुळशी – 23

Back to top button