राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 74 टक्के मतदान | पुढारी

राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 74 टक्के मतदान

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दोन हजार 369 ग्रामपंचायती आणि रिक्त असलेल्या 130 सरपंचपदांसाठीची निवडणूक रविवारी पार पडली. बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती वगळता या निवडणुकीत सरासरी 74 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने वर्तविला आहे. नक्षलग्रस्त भाग वगळता अन्य सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी पार पडणार आहे.

राज्यातील बदलती राजकीय समीकरणे, मराठा आरक्षणावरून ढवळून निघालेले राजकारण आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका यांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांना महत्त्व आले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाहीत. मात्र, सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक नेते विविध पॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील राजकारणावर पकड ठेवण्यासाठी आपली ताकद पणाला लावत असतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन हजार 369 ग्रामपंचायतींसाठीची ही निवडणूक पार पडली. रविवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदान पार पडले. तर गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांमध्ये सकाळी साडेसात ते दुपारी तीन या कालावधीत मतदान झाले.

सातार्‍यात चुरशीने 77 टक्के मतदान

सातारा : सातारा जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतीसाठी रविवारी किरकोळ अपवाद वगळता चुरशीने व शांततेत मतदान झाले. कराड, पाटण, वाई, खटाव, माण या तालुक्यांमध्ये जास्त ग्रामपंचायती असल्याने चुरस दिसून आली. 64 ग्रामपंचायतीसाठी 216 मतदान केंद्रावर 77.28 टक्के मतदान झाले.

सांगलीत 82.15 टक्के मतदान

जिल्ह्यातील 83 ग्रामपंचायतीसाठी रविवारी किरकोळ प्रकार वगळता शांततेत पण चुरशीने 82.15 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी पाचनंतर मतदार आल्याने मतदानाची प्रक्रिया सायंकाळी साडे सहापर्यंत सुरू होती. प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अकरा संवेदनशील गावांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button