रखडलेल्या पावसाने घात केला; जूनमध्ये मराठवाड्यात ८२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले | ग्राऊंड रिपोर्ट | पुढारी

रखडलेल्या पावसाने घात केला; जूनमध्ये मराठवाड्यात ८२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले | ग्राऊंड रिपोर्ट

Marathwada Agrarian Crisis - बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३० शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल

सुहास चिद्रवार, गौतम बचुटे, अमोल मोरे

पुढारी ऑनलाईन : “मी जागी होते तोपर्यंत महेश कीर्तन ऐकत होता, पण माझा डोळा लागला आणि महेशने गळफास घेतला.” कुंबेफळ येथील महेश भागवत थोरात या शेतकऱ्याने दुबार पेरणीच्या संकटापुढे नमते घेत १६ जुलैला जीवनयात्रा संपवली. त्यांच्या आईच्या तोंडचे हे वाक्य आहे. पेरणीसाठी कर्ज घेतले, पेरणी केली पण पाऊसच नसल्याने पीक उगवणार तरी कसे आणि कर्जाची फेड व्हायची कशी, या प्रश्नाने महेशला पछाडले होते. लाखभर रुपयांच्या कर्जासाठी ३० वर्षांच्या महेशला दोरी गळ्याला लावणे हाच पर्याय होता. (Marathwada Agrarian Crisis)

पाऊस नसल्याने कर्ज काढून केलेली पेरणी जून महिन्यात वाया गेली, जे उगवले ते किडीने फस्त केले, पुन्हा पेरणी करण्यासाठी पैसे नाहीत, आणि घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या दुष्टचक्रात मराठवाड्यातील शेतकरी अडकलेले आहेत. जून महिन्यात मराठवाड्यात ८२ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचे केल्याचे आकडेवारीवरून दिसते. या समस्येचा ग्राऊंड रिपोर्ट करत असताना जुलै महिन्यातील शेतकऱ्यांच्या जीवन संपवण्याच्या घटनांची आकडेवारी उपलब्ध झालेली नव्हती पण यातील एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे महेश थोरात.

शेतीशी संबंधित विविध कारणांनी शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवण्याच्या घटनांत मराठवाड्यात सतत वाढ होत असल्याचे दिसून येते. जून आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला रखडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या विंवचनेत भरच घातली.

‘महेशने दोर आधीच आणला होता’ | Marathwada Agrarian Crisis

महेशचे गाव कुंबेफळ हे गाव केजपासून ६ किलोमीटरवर आहे. १९ जुलैला बुधवारी सायंकाळी आम्ही थोरातांच्या घरी पोहोचलो. थोरातांचे झोपडीवजा घर दुःखात बुडाले होते. आई, बहीण आणि भाऊ घरीच बसून होते. वडील भागवत यांच्या पायाला गँगरीन झाले आहे, करता मुलगाच नाही तर गुरंढोर ठेऊन तरी काय करणार असे म्हणत त्यांनी घरातील होता तो बैल महेशच्या निधनानंतर दोन दिवसांतच विकला होता.

महेश थोरात यांचे कुंबेफळ येथील घर

महेशने घरासमोरी चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. घरातून हे झाड स्पष्ट दिसते. झाडला लटकलेल्या महेशच्या देहाची प्रतिकृती या माऊलीच्या डोळ्यासमोरून हटत नव्हती. “महेश शनिवारपासूनच अस्वस्थ होता. दवाखान्यात जायचं का असे विचारलेही होते, पण त्याने नकार दिला. बाहेर जेवलो आहे, असे सांगून त्यानं रात्रीचे जेवणही टाळले,” महेशची आई सांगत होती. महेशच्या आईचे शब्द ऐकून आम्ही गलबलून गेलो. आई, बहीण, भाऊ महेशच्या फोटो जवळच बसून होते. महेशने गळफास घेण्यासाठी दोर आधीच घरी आणून ठेवला होता, हे जर लक्षात आले असते तर पुढचे अघटित टळले असते, असे थोरात कुटुंबीयांना राहून-राहून वाटते.

महेशच्या निधनानंतर गावकरीही अस्वस्थ होते. गावचे सरपंच विष्णू थोरात आमच्यासोबत होते. “महेश पदवीधर होता, कष्टाळू होता. सोयाबीनच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने त्याने पीककर्ज घेतले होते,” असे त्यांनी सांगितले.

थोरातांचे घरातून आमचा पाय निघत नव्हता, त्यांचे सांत्वन करण्यासाठीचे आमच्याकडे शब्दही नव्हते. सूर्यास्तावेळी आम्ही थोरात यांच्या घरातून बाहेर पडलो. मराठवाड्यातील शेतकरी संकटांच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. यातील काही शेतकरी महेशच्या मार्गाने जात जीवनयात्रा संपवत आहेत. संकटांचे हे दुष्टचक्र केव्हा तरी संपणार आहे का, हा एकच प्रश्न सतत आमच्या मनात येत होता.

जूनमध्ये सरासरीच्या फक्त ४४ टक्के पाऊस | Marathwada Agrarian Crisis

शासकीय आकडेवारी पाहिली तर जून महिन्यात मराठवाड्यात १ ते ३० जूनदरम्यान सरासरी १३४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते. परंतु, यंदा केवळ ५५.५ मि.मी. पावसाची हजेरी लागली होती. जुलैचे पहिले काही दिवसही पावसाने ओढ दिली होती.

जिल्हानिहाय संख्या

जून महिन्यात सर्वाधिक ३० शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या नोंदी बीड झाल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांतील आकडेवारी अशी. छत्रपती संभाजीनगर १०, जालना-२, परभणी-६, हिंगोली-४, नांदेड-२४, लातूर-६, धाराशिव-१०

मराठवाड्यात अडीच वर्षांत २३९२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले

विविध संकटामुळे मराठवाड्यात शेतकरी जीवन संपवत आहेत. २०२१ साली ८८७ तर २०२२ साली तब्बल १०२२ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविले आहे. यावर्षी पहिल्या सहा महिन्यातच म्हणजे जानेवारी ते जून २०२३ दरम्यान ४८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. केवळ अडीच वर्षात मराठवाड्यात तब्बल २३९२ शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली.

हेही वाचा

Back to top button