नगर : अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित | पुढारी

नगर : अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

शेवगाव तालुका (नगर )  : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या 20 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात अद्यापही अनुदान जमा झाले नाही. तर, अवकाळी नुकसान भरपाईचा अद्याप ठावठिकाणा नाही. सत्तेच्या घडामोडीत शासनासह सर्वच राजकीय पुढार्‍यांना शेतकर्‍यांचा विसर पडल्याने संताप व्यक्त होत आहे. गतवर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रास शासनाने अनुदान जाहीर केले. सदर अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास नवीन प्रणालीचा वापर करण्यात आला. तालुक्यात 94 गांवातील 52 हजार 363 शेतकर्‍यांचा नुकसान डाटा प्रशासनाला सादर झाला.

त्यातील 43 हजार 146 शेतकर्‍यांचा डाटा पास झाला आणि केवायसी, खाते नंबर चूक, आधारकार्ड नंबर, बँक आयएफसी कोड, अशा इतर अपूर्ण माहितीने 9 हजार 217 शेतकर्‍यांचा डाटा दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे. तर, 31 हजार 880 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग झालेली आहे. मात्र, जवळपास 20 हजार शेतकर्‍यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये प्रमाणे देण्यात येणारे अनुदान अद्याप मिळालेले नाही. अनेक शेतकरी यासाठी तहसील कार्यालयात चकरा मारताना दिसत आहेत. मात्र, शासनाच्या नवीन प्रणालीद्वारे मदत जमा होत असल्याने, याबाबत काही सांगता येत नसल्याचे उत्तर दिले जात आहे.

त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे या अडचणींबाबत शासनाचे विशेष लक्ष केंद्रीत होत नसल्याने शेतकर्‍यांत संताप निर्माण झाला आहे. दरम्यान, यंदा एप्रिल महिन्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने कांदा, गहू, मका, उन्हाळी बाजरी अशा पिकाचे मोठे नुकसान झाले. भातकुडगाव, बक्तरपुर, अंत्रे, देवटाकळी, भायगाव, शहरटाकळी, ढोरसडे, मजलेशहर, जोहरापूर, खामगाव, हिंगणगाव, भाविनिमगाव, सुलतानपूर बु, ढोरजळगाव-ने, आखतवाडे, मळेगाव, सामनगाव, आव्हाणे, ढोरजळगाव-शे, आपेगाव, गरडवाडी, वाघोली, निंबे या 23 गावांतील 7 हजार 350 शेतकर्‍यांचे 4 हजार 844 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले. त्यासाठी 85 लाख 55 हजार रूपये मदतीचा अहवाल शासन दरबारी सादर झालेला आहे.

त्यानंतर पुन्हा अवकाळीने शेवगाव, वरूर बु, वरूर खु, अमरापूर येथील 88 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले. त्यासाठी 15 लाख रूपये मदतीचा अहवाल सादर झाला. मात्र, गतवर्षी झालेल्या नुकसानीची मदत अद्याप काही शेतकर्‍यांना मिळाली नसल्याने, अवकाळी मदतीचा तर ठावठिकाणाच लागत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पेरणी योग्य पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. गतवर्षीचे नुकसान, यंदा पेरणीस विलंब, असे संकट असताना शासनाचे शेतकर्‍यांकडे होणारे दुर्लक्ष ही गंभीर बाब असून, तातडीने उर्वरित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर मदत जमा करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

ही हे वाचा : 

नगर : पीक कर्जाचे 1.40 लाख लांबविले ; जामखेड बसस्थानकाजवळ भरदुपारी चोरट्याने मारला डल्ला

Maharashtra Cabinet Expansion | अजित पवार यांच्याकडे वित्त खाते?

Back to top button