Maharashtra Tomato Farmer Success Story : पुण्यातील शेतकरी एका महिन्यात टोमॅटो विकून बनला करोडपती ! जाणून घ्या सविस्तर | पुढारी

Maharashtra Tomato Farmer Success Story : पुण्यातील शेतकरी एका महिन्यात टोमॅटो विकून बनला करोडपती ! जाणून घ्या सविस्तर

पुढारी ऑनलाईन: टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे अनेकांच्या किचनचे बजेट कोलमडले आहे. तसेच अनेक भाज्यांची चव बिघडली आहे. सध्या देशात टोमॅटोला सोन्याचा भाव आला आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. परंतु, टोमॅटोचे वाढलेले भाव हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी जो टोमॅटो शेतकरी रस्त्यावर फेकून देत होते, त्याच्या लागवडीपासून अंतर राखत होते, आज तोच टोमॅटो त्यांना करोडपती बनवत आहे.

आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत. या शेतकऱ्याने आपल्या शेतात घाम गाळून टोमॅटो पिकवला आणि करोडपती झाला. पुणे जिल्ह्यात जुन्नर हा एक तालुका आहे. जुन्नर प्रामुख्याने हिरवा पट्टा म्हणून ओळखला जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक धरणे याच तालुक्यात आहेत आणि हेच या गावाच्या बदलाचे प्रमुख कारण आहे. या गावातील एक शेतकरी टोमॅटो विकून करोडपती झाला आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात गेल्या शुक्रवारी चांगल्या प्रतीच्या टोमॅटोच्या एका क्रेटला (२० किलो) टोमॅटोचा सर्वाधिक भाव २५०० रुपये म्हणजेच १२५ रुपये किलो होता. बाजारातील वाढलेल्या किमतीमुळे देशातील अनेक टोमॅटो उत्पादक करोडपती झाले आहेत. एवढा भाव मिळण्याची इतिहासात ही पहिलीच वेळ असल्याने शेतकरी प्रचंड सुखावला आहे.

आपल्याकडे साधारणपणे शेती हा तोट्याचा व्यवसाय मनाला जातो. पीक चांगले आले, परंतु भाव कमी असेल तर ते रस्त्यावर फेकून द्यावे लागते. पण जुन्नर तालुक्यातील पाचघर गावचे शेतकरी तुकाराम गायकर यांनी टोमॅटोची अशी शेती केली की, या टोमॅटोनेच त्यांना श्रीमंत बनवत करोडपती केले. जुन्नरमध्ये शेतात काळ्या रंगाची माती असून त्यामध्ये वर्षभर पाणी राहते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना कांदा व टोमॅटोची लागवड करणे शक्य होते. या गावात जिकडे पाहावे तिकडे टोमॅटोची शेती दिसते. यावर्षी टोमॅटोने येथील अनेकांचे नशीब पालटले आहे. याच टोमॅटोने शेतकरी तुकाराम गायकर कुटुंबाचे देखील नशीब पालटले आहे.

गायकर कुटुंबाची कहाणी

जुन्नर तालुक्यातील पाचघर येथील तुकाराम भागोजी गायकर यांची १८ एकर बागायती जमीन आहे. यामध्ये ते मुलगा ईश्वर गायकर आणि सून सोनाली गायकर यांच्या मदतीने 12 एकरांवर टोमॅटोची लागवड करतात. सध्या त्यांची बागायती जमीन सोने उगवत आहे. गायकर यांच्या टोमॅटो लागवडीमुळे परिसरातील जवळपास 100 हून अधिक महिलांना रोजगार मिळाला आहे.

गायकर यांची सून सोनाली या टोमॅटो बागेची मशागत, काढणी, क्रेट भरणे, फवारणी आदी कामे करतात, तर मुलगा ईश्वर गायकर हे विक्री व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन करतात. गेल्या तीन महिन्यांच्या त्यांच्या मेहनतीला चांगली बाजारपेठ मिळाली आहे. गेल्या महिन्यापासून त्यांनी 13,000 टोमॅटो क्रेटच्या विक्रीतून 1.25 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या टोमॅटोला ग्रेडनुसार प्रति क्रेट 1000 ते 2400 रुपये भाव मिळाला. गायकर यांच्यासारखे या परिसरातील 10 ते 12 शेतकरी टोमॅटो विकून करोडपती झाले आहेत.

हेही वाचा:

अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन, बंद खोलीत आढळला मृतदेह

पुणे : भोर येथे व्यापार्‍यांना वृक्षतोडीची परवानगी

हिरकणी कक्षाअभावी स्तनदा मातांची गैरसोय

 

Back to top button