पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा पावसाळी अधिवेशनाला आज (दि.१७) प्रारंभ झाला. सभागृहाचे कामकाज सुरुवात होताच विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा आराेप केला. याला उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. मात्र या उत्तरावर समाधानी न झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. (Maharashtra Monsoon Session) यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. दरम्यान, विधान परिषदेचेही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज सुरु होताच कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पाऊस आणि पीकपाणी संबंधित चिंता व्यक्त केली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. अशातच राज्यात बोगस बियाणे देण्याचे प्रमाण वाढ झाली आहे. या टोळीवर तात्काळ कारवाई करावी. राज्य सरकराने नुकसानग्रस शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदा राज्यात पाऊस कमी आहे. ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्याचा एक आराखड शासनाने तयार केला आहे. या प्रश्नी केवळ विरोधकांनाच काळजी आहे, असे नाही सत्ताधाऱ्यांनाही शेतकर्यांची काळजी आहे. असे फडणवीस यांनी सांगितले मात्र या उत्तरावर समाधानी न झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग करत सरकारचा निषेध केला.
विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायर्यावर तीव्र निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध केला.घटनाबाह्य, कलंकित सरकारचा धिक्कार असो, असा फलक हाती घेवून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारचा निषेध केला. यावेळी घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असाे, अशी जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. यावेळी शरद पवार गटाचे आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात ठाकरे गटाने अपात्रतेची नोटीस बजावली आहे. घटनात्मक पदावर असतानाही त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देणे नियमबाह्य आहे. यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी मागणी नोटीसीतून करण्यात आली आहे. यावरुन गदारोळ झाल्याने विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
हेही वाचा :