Arun Gandhi Passes Away : अरुण गांधी यांना अखेरचा निरोप; कुटुंबीयांना अश्रू अनावर | पुढारी

Arun Gandhi Passes Away : अरुण गांधी यांना अखेरचा निरोप; कुटुंबीयांना अश्रू अनावर

वाशी (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : अरुण गांधी यांच्या पार्थिवावर वाशी (ता. करवीर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी स्नुषा सोनल गांधी, नात कस्तुरी गांधी उपस्थित होते. (Arun Gandhi Passes Away)

दुपारी चार वाजता गांधी यांचे पार्थिव वाशी येथे आणण्यात आले. तेथे महात्मा गांधी यांची प्रार्थना करण्यात आली. सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अवनि’ संस्थेच्या अनुराधा भोसले, बाजीराव खाडे, ‘भोगावती’चे माजी संचालक बी. ए. पाटील, मिलिंद पाटील, विष्णू पाटील-कुर्डुकर यांनी श्रद्धांजली वाहिली. (Arun Gandhi Passes Away)

यावेळी शाहू महाराज, आ. ऋतुराज पाटील, ‘भोगावती’चे व्हाईस चेअरमन उदयसिंह पाटील-कौलवकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, ‘भोगावती’च्या संचालिका अनिता पाटील, श्रीराम समूहाचे अध्यक्ष बी. ए. पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, भारती पोवार, अमरजा निंबाळकर, विजय भोसले, कृष्णा धोत्रे, तौफिक मुल्लाणी, गणी आजरेकर, गिरीश फोंडे, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. (Arun Gandhi Passes Away)

कोल्हापूरबद्दल कृतज्ञता (Arun Gandhi Passes Away)

माझ्या वडिलांना कोल्हापूरने भरभरून प्रेम दिले. त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत कोल्हापूर सोडले नाही. अंत्यसंस्कारावेळी व्यक्त झालेल्या भावनांतून कोल्हापूरवासीयांचे गांधी घराण्यावरील प्रेम दिसून आले. कोल्हापूरकरांचे हे ऋण जीवनभर विसरणार नाही, अशा शब्दांत तुषार गांधी यांनी कोल्हापूरबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शुक्रवारी शोकसभा

अरुण गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन येथे शोकसभा आयोजित केली आहे.

नव्या पिढीपर्यंत महात्मा गांधी यांचे विचार पोहोचविण्याचा प्रयत्न करत, अरुण गांधी यांनी समाजकार्याचा वसा आयुष्यभर जपला.
– आ. सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस

वैश्विक विचार मांडणार्‍या अरुण गांधी यांची आजच्या विद्वेश पसरविणार्‍या समाजात गरज होती.
– डॉ. उदय नारकर, राज्य सचिव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

गांधी विचारांचे पाईक असणार्‍या अरुण गांधी यांच्या निधनामुळे या विचारांचा मोठा आधार गेला आहे.
– सुरेश शिपूरकर

समाज व देशाला तारणार्‍या एका व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने वैचारिक पोकळी निर्माण झाली आहे.
– व्यंकाप्पा भोसले

अरुण गांधी यांच्या निधनाने चांगला मार्गदर्शक हरपला आहे.
– सुंदरराव देसाई

अरुण गांधी यांच्या निधनामुळे जनआंदोलनाचा आधारवड काळाच्या पडद्याआड गेला आहे.
– मेधा पाटकर

अरुण गांधी यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवेदनशील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
– डॉ. मेघा पानसरे

‘अवनि’ संस्थेच्या बालगृहात घेतला अखेरचा श्वास 

ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते व लेखक, अहिंसा आणि सामाजिक न्यायाच्या वकिलीसाठी जगभर ओळखले जाणारे महात्मा गांधी यांचे नातू अरुण मणिलाल गांधी (वय 89) यांनी मंगळवारी येथील ‘अवनि’ संस्थेच्या बालगृहात अखेरचा श्वास घेतला. जीवनभर अहिंसेचा पुरस्कार केलेल्या गांधी यांच्या पार्थिवावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समतेच्या करवीरनगरीतच वाशी (ता. करवीर) येथे महात्मा गांधी फाऊंडेशनच्या जागेत कोणताही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा तुषार गांधी, मुलगी अर्चना प्रसाद, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

‘अवनि’ संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण आणि अरुण गांधी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्या या मैत्रीतूनच गांधी यांचा डोक्यावर छप्पर नसलेल्या व निराधारांना आधार देणार्‍या ‘अवनि’ या संस्थेशी घनिष्ठ संबंध आला. 1999 मध्ये गांधी यांनी पहिल्यांदा ‘अवनि’ संस्थेस भेट दिली. त्यांच्या कार्याने भारावून गेलेले गांधी गेल्या 26 वर्षांपासून ‘अवनि’शी जोडले गेले होते.

दरवर्षी कोल्हापुरात वास्तव्य

वर्ल्डवाईड एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अरुण गांधी यांनी ‘अवनि’च्या बालगृहासह अनुराधा भोसले यांच्या कार्याला सातत्याने सहकार्य केले. दरवर्षी डिसेंबरमध्ये ते भारतात येत असत. भारतात येताच ते ‘अवनि’ संस्थेला सदिच्छा भेट देत असत. यावर्षीही फेब—ुवारी 2023 मध्ये अरुण गांधी यांनी “अवनि’ होम फॉर गर्ल्स’ला भेट दिली. यावेळी ते दहा दिवस वास्तव्य करणार होते. मात्र, चार-पाच दिवसांतच अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठ ते दहा दिवसांच्या उपचारांनंतर ते पुन्हा ‘अवनि’ संस्थेच्या बालगृहामध्ये वास्तव्यास होते. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना डॉक्टरांनी प्रवास टाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ते ‘अवनि’च्या आवारातील एका इमारतीत वास्तव्यास होते. गेल्या दहा वर्षांपासून ‘अवनि’मध्ये वास्तव्यास असलेले मूळचे अमेरिकन नागरिक स्कॉट कफोरा हे त्यांची सतत काळजी घेत असत. अनुराधा भोसले आणि गांधी यांचे मुलगी आणि वडील असे नाते होते.

अखेरपर्यंत कार्यरत

सोमवारी त्यांनी बालगृहात महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर रात्री साडेदहापर्यंत ते संस्थेत गप्पा मारत बसले होते. मंगळवारी पहाटे त्यांना अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला. भोसले यांनी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण ‘अवनि’ परिवारावर शोककळा पसरली आहे.

दक्षिण आफ्रिकेत कारावास

अरुण गांधी यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. ते महात्मा गांधी यांचे पाचवे नातू होत. बारा वर्षांचे असताना 1946 मध्ये ते आजोबा महात्मा गांधी यांच्यासोबत भारतात वास्तव्यास आले. अरुण गांधी यांनी सेवाग्राममध्ये आजोबांसोबत दोन वर्षे केलेल्या वास्तव्यात त्यांना अहिंसेची तत्त्वे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल माहिती मिळाली. 1948 मध्ये दक्षिण आफ्रिकेत परतल्यानंतर ते तेथील वर्णभेदविरोधी चळवळीत सहभागी झाले. या लढ्यात त्यांना कारावासही भोगावा लागला. 1956 मध्ये ते पत्रकार म्हणून काम करण्यासाठी भारतात आले. 1960 मध्ये ते भारताचे नागरिक झाले.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

अरुण गांधी यांनी ‘द गिफ्ट ऑफ अँगर : अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’ यासह अनेक पुस्तके लिहिली. या पुस्तकात आजोबांसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधातून त्यांच्या वाढीचा आणि आत्मशोधाच्या वैयक्तिक प्रवासाचे वर्णन केले आहे. अहिंसा, सामाजिक न्याय आणि महात्मा गांधींचा वारसा यावरही गांधी यांनी विपुल लेखन केले. 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कारासह त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

गांधी विचारांचा प्रसार

गांधी यांनी पत्रकार, संपादक म्हणून काम केले, भारत आणि परदेशात अहिंसा आणि सामाजिक न्यायाचा प्रचार केला. त्यांनी परिषदा आणि विद्यापीठांमध्ये आपल्या वक्तृत्वाने महात्मा गांधींच्या आदर्शांचा प्रचार केला. 1987 मध्ये त्यांनी एम. के. गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉनव्हायलेन्स इन मेम्फिस, टेनेसी या संस्थेची स्थापना केली.


अधिक वाचा :

Back to top button