Sharad Pawar Resigns : शरद पवारांच्या निवृत्तीनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचे भाविनक पत्र | पुढारी

Sharad Pawar Resigns : शरद पवारांच्या निवृत्तीनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचे भाविनक पत्र

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर फक्त राष्ट्रवादी पक्ष (NCP) अथवा त्यांचे कार्यकर्त्यांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रालाच धक्का बसला. शरद पवारांच्या या एका निर्णयामुळे आता राज्याचेच नव्हे तर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह त्यांचे कार्यकर्ते व इतर पक्षातील नेतेमंडळी सुद्धा विनंती करत आहे. यावर अनेक नेते प्रतिक्रीया देत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena – Uddhav Balasaheb Thackeray) उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी शरद पवार यांना भावनिक पत्र लिहित आवाहन केले आहे. संपूर्ण राजकीय विश्वातून सध्या या पत्राची चर्चा सुरु झाली आहे. (Sharad Pawar Resigns)

सामाजिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या व आपल्या वक्तृत्वाने स्वत:ची स्वंतत्र ओळख निर्माण करणाऱ्या सुषमा अंधारें यांनी शिवसेनेत प्रवेश केला व त्या तेथील उपनेत्या बनल्या. सुषमा अंधारे यांना शिवसेनेचा ठाकरे गटाचा आवाज असल्याचे सुद्धा म्हटले जाते. महाविकास आघाडीद्वारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांच्यात एक जिव्हाळा निर्माण झाला आहे. तसाच जिव्हाळा अनेक वेळा आपण ठाकरे गटांच्या व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुद्धा पाहिला आहे. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, उद्वव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा जिव्हाळा आपल्या सर्वांनाच माहित आहे. तसाच जिव्हाळा सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी यांच्यात सुद्धा आहे. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर भावनिक होत सुषमा अंधारे यांनी त्यांना पत्र लिहले आहे. (Sharad Pawar Resigns)

सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात त्या म्हणतात… (Sharad Pawar Resigns)

आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब,

सर नमस्ते,

खरंतर मी आपल्याला लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहिले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्य ही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणुनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही.

सर , बदल हा सृष्टीचा नियम असतो जे काल होते ते आज असेलच असे नाही, जे आज आहे, ते उद्या राहीलच असे नाही पण असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो. महाराष्ट्राच्या बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे. कदाचित आपल्या नंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतील ही पण सर, माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील ही माणसं आपण उभी केलीत.

कुणी काहीही म्हटलं तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्या पारखी डोळ्यांनी हेरले. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले.

सर, एकीकडे ना. धो. महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे. तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला. सर, कोणताही पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी चार गुणांची चतुसूत्री एकत्र असणे अत्यंत गरजेचे असते. एक नेतृत्व, दोन वक्तृत्व, तीन विचारधारा, चार संघटन कौशल्य. आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे. हे सत्य महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारता येणार नाही.

शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही.

…… पण आपला अनुभव प्रश्न हाताळण्याचे हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे. एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे. त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही, तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे.

– प्रा. सुषमा अंधारे

Back to top button