पहाटेचा शपथविधी : अजितदादांचे बंड शरद पवारांनी कसे शमवले? – ‘लोक माझे सांगाती’मध्ये माहिती

पहाटेचा शपथविधी : अजितदादांचे बंड शरद पवारांनी कसे शमवले? – ‘लोक माझे सांगाती’मध्ये माहिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. 'लोक माझे सांगाती', या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजित पवार यांनी उचललेलं पाऊल अत्यंत गैर होतं, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, हे सर्व माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही पवारांनी सांगितले आहे. (Sharad Pawar on Ajit Pawar Revolt in Lok Maze Sangati)

Sharad Pawar on Ajit Pawar in Lok Maze Sangati

अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर 'लोक माझे सांगाती'च्या दुसऱ्या आवृत्तीत शरद पवार यांनी काय म्हटलं आहे, हे जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दांत …

2019 मध्ये राजकीय हालचाली वेगानं घडत होत्या. सरकारस्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला असतानाच एक अभूतपूर्व वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आलं. २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोचलेले असून, अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत,' अशी माहिती मला देण्यात आली. तो मोठा धक्का होता.

'महाविकास आघाडी'चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं. मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं, जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत. त्यांच्यापैकीच एक- दोघांशी फोनवर बोलल्यानंतर लक्षात आलं, की हे माझ्या संमतीनंच घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. काही मिनिटांतच मी सावरलो. घडलेलं धक्कादायक तर होतंच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आलं होतं.

'उद्धव ठाकरे यांना स्वतः फोन केला'

'महाविकास आघाडी'चा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपानं केलेला हा रडीचा डाव होता. यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी, हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं. मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. 'अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,' असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं.

खासदार शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज मुंबईमध्ये वायबी चव्हाण सेंटर प्रकाशन झाले. लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीत नवीन सत्तर पानांची जोड आहे. या आवृत्तीत 2019 नंतर महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती कशी तुटली? आणि महाविकास आघाडीची निर्मिती कशी झाली?, यावर पवारांनी या आवृत्तीत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच, या शिवाय 2019 नंतरच्या काही अत्यंत महत्त्वा‍च्या घडामोडींवरही शरद पवार यांनी या आवृत्तीत भाष्य केले आहे. त्यामुळे या आवृत्तीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news