विरोधी आघाडी मजबूत तर राष्ट्रीय राजकारणासाठी जास्त वेळ देण्याची पवारांची रणनीती; राजकीय वर्तुळात चर्चा | पुढारी

विरोधी आघाडी मजबूत तर राष्ट्रीय राजकारणासाठी जास्त वेळ देण्याची पवारांची रणनीती; राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिग्गज नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद देशाची राजधानी दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही उमटत आहेत. विरोधी आघाडी मजबूत करण्याबरोबरच राष्ट्रीय राजकारणासाठी जास्त वेळ देण्याच्या हेतूने पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले असल्याचे मानले जात आहे.
केंद्रातील मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी तमाम विरोधी पक्षांना एकत्र आणणे गरजेचे असल्याचे पवार यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांची भेट घेऊन सांगितले होते. विरोधी आघाडी मजबूत करण्याकरिता आप नेते अरविंद केजरीवाल तसेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना सोबत घेणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद त्यावेळी पवार यांनी केला होता. विशेष म्हणजे याच्या काही दिवस आधीच पवार यांनी अदानी उद्योग समुहासंदर्भातील चौकशीसाठी जेपीसी गरज नसल्याचे सांगत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना धक्का दिला होता.
शरद पवार यांची राष्ट्रीय राजकारणातील महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. एकीकडे राष्ट्रवादीची राज्यातील धुरा अन्य नेत्याकडे सोपवून स्वतः देशाच्या राजकारणात पूर्ण वेळ द्यायच्या धोरणाने त्यांनी अध्यक्षपद सोडले असल्यास नवल वाटू नये, असे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अवघा वर्षभराचा काळ राहिलेला आहे. अशावेळी राष्ट्रीय राजकारणात आपण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असाही पवार यांना विश्वास असावा. अर्थातच याबाबतचे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

पवारांच्या राजीनाम्यावर नेत्यांच्या प्रतिक्रिया

काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी 
शरद पवार हे देशाच्या राजकारणातले सक्षम नेते आहेत. कदाचित वाढत्या वयामुळे अध्यक्षपद नव्या दमाच्या नेत्याकडे जबाबदारी देण्याचा त्यांचा मानस असावा. शरद पवार यांची जागा घेण्यासाठी राष्ट्रवादीकडे अनेक पात्र नेते आहेत. अध्यक्षपद सोडले असले तरी ते देशाचे नेते आहेत, यात काही शंका नाही.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल
पवार यांनी अध्यक्षपद का सोडले याचा नेमका अंदाज बांधता येत नाही. पण वयामुळे अथवा काही अंतर्गत समस्येमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असे मला वाटते.
पवारांचे एकेकाळचे साथीदार तारिक अन्वर
शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना केली होती, तेव्हा दोन प्रमुख नेते त्यांच्यासोबत आले होते. हे दोन नेते म्हणजे स्व. पी. ए. संगमा आणि बिहारचे तारिक अन्वर हे होय. पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यासंदर्भात बोलताना अन्वर यांनी पवार यांच्याकडे निश्चितपणे पुढील योजना असावी, असे सांगितले.
काँग्रेस नेते रशीद अल्वी
पवार हे सन्माननीय नेते आहेत. राजीनामा देणे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षनेते म्हणून ते पुढील काळातही महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.

Back to top button