Job : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये 19 हजार पदे भरणार | पुढारी

Job : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये 19 हजार पदे भरणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदअंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण 18 हजार 939 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी दिल्या आहेत.

चांदेकर यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निर्देशानुसार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून, दि. 15 ऑगस्ट, 2023 पूर्वी संबंधित पदे भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणार्‍या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणार्‍या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांतील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदभरतीसाठी आयबीपीएस कंपनीबरोबर सांमजस्य करार करण्यात आला आहे.

परीक्षेच्या आयोजनाबाबत परीक्षार्थ्यांनी चौकशी केली असता, जिल्हा परिषदेकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे समजते आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच, गेल्या चार वर्षापासून पदभरती झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव— असंतोष आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांनी पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी तयार करावी, ज्यामध्ये शासनस्तरावर पदभरतीसाठी झालेली कार्यवाही आणि जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेल्या पदभरतीबाबतची सद्य:स्थितीचा अंतर्भाव असावा, तसेच आगामी परीक्षा घेण्याबाबतचे नियोजन असावे. जिल्हा परिषदांनी पदभरतीची माहिती शंकानिरसन करण्याकरिता हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा आणि पदभरती विषयास सर्वोच्च प्राथमिकता देऊन पदभरतीला विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे.

Back to top button