Maharashtra Budget 2023 : नाट्यपंढरी सांगलीसाठी राज्याच्या बजेटमध्ये २५ कोटी | पुढारी

Maharashtra Budget 2023 : नाट्यपंढरी सांगलीसाठी राज्याच्या बजेटमध्ये २५ कोटी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या बजेटमध्ये नाट्यपंढरी सांगलीत तीन मजली अद्ययावत नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सांगलीत हनुमाननगरमध्ये ऑक्सिडेशन पाँडजवळ महानगरपालिकेच्या खुल्या जागेत हे नाट्यगृह उभारले जाणार आहे. (Maharashtra Budget 2023)

नाट्यपंढरीतील अद्ययावत नाट्यगृहाची असलेली उणीव आता भरून निघणार आहे. सांगली ही नाट्यपंढरी आहे. मात्र, याठिकाणी  अद्ययावत नाट्यगृहाचा अभाव आहे. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दूरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून अद्ययावत नाट्यगृहासाठी शासनाला 38 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. (Maharashtra Budget 2023)

आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे नेते शेखर इनामदार, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. शासनस्तरावर बराच पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली. त्याचा परिणाम म्हणून राज्य शासनाच्या बजेटमध्ये सांगलीत हनुमाननगर येथे नव्याने होणार्‍या नाट्यगृहास 25 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. (Maharashtra Budget 2023)

आमदार गाडगीळ म्हणाले, सांगलीत अद्ययावत नाट्यगृह उभारावे ही मागणी बर्‍याच वर्षांपासूनची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नाट्यगृहासाठी 25 कोटी मंजूर केले आहेत. सांगलीकरांकडून या निर्णयाचे स्वागत आहे.

शेखर इनामदार म्हणाले, प्रस्तावित नाट्यगृह 38 कोटी रुपयांचे आहे. राज्य बजेटमध्ये 25 कोटींची तरतूद झाली आहे. उर्वरीत निधीही शासनाकडून उपलब्ध करून आणू.


अधिक वाचा :

Back to top button