नगरला अवकाळीचा तडाखा; राहुरी, कर्जत, नेवासा तालुक्यांत वादळी पाऊस; काही ठिकाणी गारा | पुढारी

नगरला अवकाळीचा तडाखा; राहुरी, कर्जत, नेवासा तालुक्यांत वादळी पाऊस; काही ठिकाणी गारा

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हयातील कर्जत, नेवासा, राहुरी तालुक्यांत मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कर्जत तालुक्यातील काही गावांत जोरदार वादळी पावसाने पिके जमीनदोस्त झाली. नेवासा तालुक्यातील सोनई, चांदा व घोडेगाव परिसरात पिकांना जोरदार तडाखा बसला. राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात गारांचा पाऊस झाला. ऐन थंडीच्या दिवसांत अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची धांदल उडाली. हातातोंडाशी आलेले रब्बी पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात थंडी सुरु आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सर्व लहानमोठी धरणे भरली गेली. नद्या, नाले वाहिले गेल्यामुळे भूजलपातळी देखील वाढलेली आहे. अशा परिस्थितीत विहिरींमध्ये पाणीचपाणी असल्यामुळे यंदा रब्बी हंगामात पेरणीची टक्केवारी वाढली.

गेल्या दोन महिन्यांपासून ज्वारी, गहु, मका व इतर पिके जोमात आली आहेत.शेतकरी आनंदात असतानाच, मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे अचानक अवकाळी पावसाने तडाखा दिला. जोरदार अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील ज्वारी, गहू तसेच डाळिंब, लिंबू फळबागाचे मोठे नुकसान झाले.

राहुरी तालुक्यातील वांबोरी, सडे, कात्रड व परिसरात गारांचा पाऊस झाला. अचानक झालेल्या गारांच्या पावसाने शेतकरी चिंतातूर झाला आहे. नेवासा तालुक्यातील चांदा, बर्‍हाणपूर परिसरात ढगाच्या गडगडाटात वादळी पावसाने हजेरी लावली. घोडेगावात विजेच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावत रब्बी पिकांचे नुकसान केले. घोडेगावात 24 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

याशिवाय घोडेगाव परिसरातील मांडेगव्हाण, लोहोगाव, झापडवाडी या गावांत वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. गहू, हरबरा, ज्वारी व मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

Back to top button