पुण्याची हरगुणकौर मथारू ‘आयसीएसई’त देशात अव्वल | पुढारी

पुण्याची हरगुणकौर मथारू ‘आयसीएसई’त देशात अव्वल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सच्या (आयसीएसई) दहावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. यात पुण्याच्या सेंट मेरी शाळेतील हरगुणकौर मथारू ही 99.80 टक्के गुण मिळवून देशात अव्वल आली. मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलची अमोलिका मुखर्जी 99.60 टक्के मिळवून देशात दुसरी आली. पहिल्या तीन क्रमांकांवर 39 विद्यार्थी आहेत. आयसीएसईच्या परीक्षेला यंदा देशातून, तसेच परदेशातून दोन लाख 31 हजार 63 विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल 99.97 टक्के इतका लागला आहे. यामध्ये मुलींचा निकाल 99.98 टक्के इतका लागला आहे. ही परीक्षा विविध 61 विषयांची घेण्यात येते. यामध्ये 20 भारतीय, तर नऊ परदेशी भाषांचा समावेश आहे. यंदा ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती.

या दोन्ही सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची सरासरी करून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशात, तसेच परदेशातील केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी 1 लाख 25 हजार 678 मुले, तर 1 लाख 5 हजार 385 मुली बसल्या होत्या. यापैकी 43 मुले आणि 16 मुली अनुत्तीर्ण झाले आहेत. परदेशातून यंदा 601 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 598 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तीन विद्यार्थ्यांना परीक्षेत यश संपादन करता आले नाही. या परीक्षेला यंदा 692 दिव्यांग विद्यार्थी बसले होते. यापैकी 78 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्यावर गुण मिळवले. तर, 22 दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी सात विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्यावर गुण मिळवले.

निकाल दृष्टिक्षेपात

तपशील : विद्यार्थी : विद्यार्थिनी
उत्तीर्ण परीक्षार्थी : 1,25,635 (99.97 टक्के) : 1,05,369 (99.98 टक्के)
अनुत्तीर्ण परीक्षार्थी : 43 (0.03 टक्के) : 16 (0.02 टक्के)

विभागनिहाय निकाल
तपशील : उत्तर : पूर्व : पश्चिम : दक्षिण : परदेशी
उत्तीर्ण विद्यार्थी : 79,918 : 73,370 : 31,026 : 46,092 : 598
परीक्षा दिलेले एकूण विद्यार्थी : 79,937 : 73,401 : 31,028 : 46,096 : 601

राज्याचा निकाल 100 टक्के
आयसीएसई परीक्षेला यंदा राज्यातील 245 शाळांमधून 26 हजार 83 विद्यार्थी बसले होते. यात 14, 122 मुले, तर 11, 961 मुलींचा समावेश होता. राज्याचा निकाल यंदा 100 टक्के लागला आहे. पहिल्या तीन क्रमांकांमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही 37 आहे. 99.60 टक्के गुणांसह राज्यात दुसर्‍या स्थानावर 11 विद्यार्थी आहेत. यात बहुतांश मुंबईच्या शाळांमधील आहेत. तर, तिसर्‍या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना 99.40 टक्के इतके गुण मिळाले आहेत.

पहिल्या सत्रातील परीक्षेतील गुण पाहून चांगले गुण मिळतील, असे वाटत होते. परंतु, संपूर्ण देशात आपण पहिले येऊ, असे कधीच वाटले नाही. पण, देशात पहिला क्रमांक आल्याचा खूप जास्त आनंद वाटत आहे. कोरोनाकाळातही शाळेने ऑनलाइनद्वारे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतला. आता विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेण्याचे ठरविले आहे.

                            – हरगुणकौर मथारू, देशात पहिली आलेली, सेंट मेरी स्कूल

Back to top button