समुद्र उधाणाच्या कक्षेत किनारपट्टीची 159 गावे | पुढारी

समुद्र उधाणाच्या कक्षेत किनारपट्टीची 159 गावे

ठाणे : जयवंत हाबळे : पावसाळ्यात अनेक वेळा समुद्राला मोठी भरती (उधाण) येते. काही वेळा उधाण आलेले असतांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडू लागला, तर समुद्रकिनार्‍यासह खाडी किनार्‍यावरील वस्त्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. यावर्षी पावसाळ्यात समुद्रामध्ये जुलै ते सप्टेंबरपर्यंत 14 वेळा मोठी भरती (उधाण) येणार असल्याने कोकणातील 159 गावे ही उधाणाच्या कक्षेत आहेत. त्यामुळे ठाणे खाडीकिनारी वस्त्या जलमय होण्याची दाट शक्यता आहे.

कोकणाला लाभलेल्या 720 किमी किनारपट्टीवर येणार्‍या पाच जिल्ह्यांमध्ये उधाणाच्या घोंगावत्या संकटात असलेली गावे भितीच्या छायेखाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 60 गावे भितीच्या छायेखाली आहेत. यामध्ये देवबाग, तारकर्ली, निवती, वेळास, तांबळडेग, विजयदूर्ग, धालवली अशा प्रमुख गावांचा समावेश आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील 37 गावे उधाणाच्या कक्षेत येत असून त्यामध्ये प्रामुख्याने गावखडी, कोर्ली, हर्णे बंदर, काळबादेवी, दाभोळ, गणपतीपुळे, मालगुंड, केळशी, आंबोळगड, जैतापूर, नाटे ही गावे येतात. तर पालघर जिल्ह्यामध्ये सफाळे, केळवे, खानिवडे, वसई, विरार, अर्नाळा या भागात समुद्राच्या उधाणात मोठे पाणी येते. या जिल्ह्यात जवळपास 35 गावे या धोक्याच्या कक्षेत आहेत. अर्ध्या मुंबईला समुद्रात ओढण्याचा धोका अनेक संशोधक व्यक्त करतात. रायगड जिल्ह्यात जवळपास 55 गावांना उधाणाचा
धोका आहे.

मागच्या दोन वर्षापासून समुद्राचे पाणी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. समुद्राला उधाण येणार असल्याचा इशारा स्थानिक वेधशाळेने द्यायला हवा होता, पण तसा देण्यात आला नाही. त्यावेळी फयान वादळ घुसणार आणि नुकसान होणार अशी सूचना स्थानिक प्रशासनाने वादळ गुजरातकडे सरकल्यावर दिली. त्यावेळी उधाणाचे पाणी वाळत घातलेले मासे पुन्हा सोबत घेऊन गेले. अनेकांनी वाळवलेले मासे पोत्यात भरले होते, ते पुन्हा भिजल्याने वाया गेले. त्यामुळे याचा ठाणे जिल्ह्यासह पालघर किनारपट्टीला जबरदस्त तडाखा बसला होता. मानवाच्या वाढत्या गरजा आणि माणसाने समुद्रावर केलेले आक्रमण यामुळे समुद्र मानवी वस्तीत घुसत आहे. उधाण सहन करण्यासाठी त्याची जागा त्याला सोडली पाहिजे आणि माणसाने आपली मर्यादा ओळखली पाहिजे, पण तसे कधी होईल काय? हा प्रश्‍नच आहे.

जुलै, ऑगस्टमध्ये 14 वेळा येणार उधाण…

पावसाळ्यात जून महिन्यात 6 वेळा हे उधाण येण्याची शक्यता होती. जुलै महिन्यात 7 वेळा, ऑगस्ट महिन्यात 7 वेळा आणि सप्टेंबर महिन्यात 6 वेळा मोठे उधाण येणार आहे.

जूनमध्ये मंगळवार 14 जून पासून शनिवार 18 जून हे सलग 5 दिवस मोठ्या भरतीचे असून या कालावधीत 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्रात दिसून आल्या. यापुढे या लाटांची उंची चार ते साडेचार मीटरपेक्षा जास्त असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जुलै महिन्यामध्ये बुधवार 13 जुलै ते रविवार 17 जुलै या कालावधीत मोठी भरतरी येणार आहे. या काळात समुद्रात 4 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तसेच 30 व 31 जुलै हे दिवसही मोठ्या भरतीचे असणार आहेत.

ऑगस्ट महिन्यामध्ये गुरुवारी 11 ऑगस्ट ते सोमवार 15 ऑगस्ट या काळात मोठी भरती येणार आहे. याही कालावधीत 2 ते सव्वा दोन मीटर उंचीच्या लाटा उसळतील. 29 व 30 ऑगस्ट या दिवशीही मोठी भरती असणार आहे. सप्टेंबर महिन्यात शुक्रवार 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर हे मोठ्या उधाणाचे दिवस असून या काळात तीन ते साडेतीन मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. जुलै महिन्यात 15 वेळा 4 मीटर, ऑगस्ट महिन्यात 20 वेळा 4 मीटर, तर सप्टेंबरमध्येही 12 वेळा 4 मीटरच्या वर लाटा उसळणार आहेत.

ठाण्यात पाणी साचण्याची ठिकाणे

ठाणे महापालिका क्षेत्रातील सखल भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. अतिवृष्टी झाल्यास काही सखल भागांमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचते. त्यापैकी कोपरी, मुंब्रा खाडीकिनारील वस्त्या ( कोळीवाडा, समशाद नगर, कौसा, काका नगर) विटावा, बाळकुम किनारी वस्त्या, साकेत (खाडी किनारी लगतचा परिसर), दिवा येथील खर्डीगाव, साबेगाव आणि देसाई नाका येथील रिव्हरवूड पार्क, वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, या सखल भागात या उधाणाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Back to top button