सेनाविरुद्ध बंडखोर सामना आज ; विशेष अधिवेशनात आज अध्यक्ष निवड | पुढारी

सेनाविरुद्ध बंडखोर सामना आज ; विशेष अधिवेशनात आज अध्यक्ष निवड

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेविरुद्ध बंड करून स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारचा विश्‍वासदर्शक ठराव सोमवारी विधानसभेत मतदानाला येणार असला, तरी रविवारी होणार्‍या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीतच या सरकारचे बहुमत सिद्ध होईल. शिवसेनाविरुद्ध बंडखोर शिंदे गट यांच्यातील पहिला सामनाही याच निवडणुकीत होत असून, शिवसेनेचा ‘व्हिप’विरुद्ध बंडखोरांचा ‘व्हिप’, असा हा रंगतदार अन् चुरशीचा सामना होऊ घातला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे 39 आमदार आहेत. तर त्यांना 11 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. या 50 आमदारांचा गट फुटल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सोमवारी बहुमत चाचणीला सामोरे जाईल.

विधानसभा अध्यक्षांची निवड आणि सरकारची बहुमत चाचणी घेण्यासाठी रविवार, सोमवारी असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. रविवारी होणार्‍या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रथमच आमदार झालेले राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवले. त्यांच्याविरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने कट्टर शिवसैनिक आ. राजन साळवी यांना उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.

शिवसेनेचे 39 आमदार शिंदे गटाने पळवल्यानंतर राष्ट्रवादी हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. तरीही शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेचे बंडखोर आमदार साळवी यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाविरोधात मतदान करतात का, हे पाहणे मोठे रंगतदार ठरणार आहे. बंडखोर आमदारांसमोर साळवींना उभे करून त्यांच्या शिवसेना निष्ठेची चाचणी घेण्याचीच खेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेळली आहे.

कुणाचा ‘व्हिप’ चालणार?

शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना हटवून गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्‍ती केली आहे. तर मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचीही निवड केली आहे. बंडखोर शिंदे गटाने एकनाथ शिंदे हेच आमचे गटनेते असल्याचे सांगितले आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद हे भरत गोगावले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांच्या नावाला संमती दिली आहे. प्रतोद आणि गटनेता कोण? हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला असताना सभागृहात कोण कोणाचा ‘व्हिप’ पाळतो, यावर विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जिंकणे किंवा पडणे अवलंबून राहील.

बंडखोरांनी शिवसेनेचा ‘व्हिप’ पाळल्यास त्यांना साळवींना मतदान करावे लागेल. तसे झाल्यास त्यांच्याकडून भाजप उमेदवार राहुल नार्वेकरांचा पराभव होईल आणि ओघानेच तो नव्या सरकारचा पराभव ठरेल. बंडखोर हा धोका पत्करणार नाहीत. सर्वाधिक आमदार आमच्याकडे असल्याने शिवसेनेच्या सोळा आमदारांना आमचाच ‘व्हिप’ लागू होईल, अशी उलट भूमिका बंडखोर गटाचे प्रवक्‍ते दीपक केसरकर यांनी जाहीर केली आहे. थोडक्यात, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध बंडखोरांचा ‘व्हिप’ असा संघर्ष होईल.

शिवसेनेची मदार चौधरी, प्रभू यांच्यावरच उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य होते. ते सदस्यही नाहीत अन् मुख्यमंत्रीही नाहीत. त्यामुळे अध्यक्ष निवडला जाताना आता ते सभागृहात विधानसभेत नसतील. अशावेळी शिवसेनेची सभागृहात खिंड लढविण्याची जबाबदारी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यावर राहील.

बंडखोर मुंबईत परतले सुरत आणि गुवाहाटीचा मुक्‍काम आटोपून गोवा मुक्‍कामी असलेले शिवसेनेचे 39 बंडखोर आमदार तब्बल 12 दिवसांनी मुंबईत परतले. मात्र, त्यांचा मुक्‍काम पंचतारांकित हॉटेलमध्येच असेल. विधानसभा अध्यक्षपदाचे मतदान झाल्यानंतरही हे सर्व आमदार कुठेही न जाता हॉटेलमध्येच परत जातील. सोमवारचे बहुमत सिद्ध होईपर्यंत हे आमदार सांभाळण्याची कसरत शिंदे यांना करावी लागणार आहे. या आमदारांना मुंबईत आणण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याला गेले आणि विशेष विमानाने शनिवारी रात्री मुंबईत परतले. त्यांच्यासोबत भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण हेदेखील होते.

शिवसेनेचे बंडखोर आमदार साळवी यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाविरोधात मतदान करतात का, हे पाहणे मोठे रंगतदार ठरणार आहे. बंडखोर आमदारांसमोर साळवींना उभे करून त्यांच्या शिवसेना निष्ठेची चाचणी घेण्याचीच खेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेळली आहे.

भाजपतर्फे नार्वेकर, शिवसेनेतून साळवी अध्यक्षपदाचे उमेदवार अध्यक्ष निवडीत होणार बहुमताची परीक्षा

आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी बजावलेला ‘व्हिप’ आम्हाला लागू होत नाही.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पक्षीय बलाबल
भाजप 106 + पाठिंबा देणारे अपक्ष 6, ‘बविआ’ 3, मनसे 1 = 116
एकनाथ शिंदे गट 50
एकूण 166

राष्ट्रवादी काँग्रेस 53
काँग्रेस 44
शिवसेना 16
माकप 1, सप 2, अपक्ष व अन्य 3
एकूण 119

‘एमआयएम’ 2 (अजून भूमिका स्पष्ट नाही)

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे 166 आमदारांचे पाठबळ दिसत असले, तरी 170 आमदारांचा पाठिंबा बहुमत चाचणीवेळी आपल्याला मिळेल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Back to top button