संचारबंदी विरोधात पंढरपुरात व्यापार्‍यांचे ‘अर्धनग्‍न’ आंदोलन | पुढारी

संचारबंदी विरोधात पंढरपुरात व्यापार्‍यांचे ‘अर्धनग्‍न’ आंदोलन

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार 13 ऑगस्टपासून पुकारलेल्या संचारबंदी ला पंढरपुरातून जोरदार विरोध होत आहे. याअंतर्गत हा निर्णय मागे घ्यावा म्हणून पंढरपूर व्यापारी महासंघाने बुधवारी दुसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘अर्धनग्‍न’ आंदोलन केले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून पंढरपूर शहर व तालुक्यात सतत लॉकडाऊनमुळे नागरिक व व्यापारी वैतागले आहेत. मागील काही दिवसांपासून पंढरपूर शहरात सतत लॉकडाऊन असल्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच आता प्रशासनाने 13 ऑगस्टपासून अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी जाहीर केल्यामुळे व्यापार्‍यांमधून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. याचाच निषेध म्हणून व्यापार्‍यांनी तीन दिवस आंदोलन पुकारले आहे.

मंगळवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. तर बुधवारी दुसर्‍या दिवशी सर्व व्यापार्‍यांनी अर्धनग्न आंदोलन केले. गुरुवारी पंढरपूर प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

व्यापार्‍यांच्या या आंदोलनाला सर्व पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. संचारबंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे, रा. पा. कटेकर, किरण घाडगे, संतोष कवडे, सोमनाथ डोंबे, सचिन कारंडे, दत्ता लटके, कौस्तुभ गुंडेवार, अप्पा मुचलुंबे, कपडेकर आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Back to top button