Satara Lok Sabha | साताऱ्यातून उदयनराजेंच्या उमेदवारीवर अखेर भाजपकडून शिक्कामोर्तब | पुढारी

Satara Lok Sabha | साताऱ्यातून उदयनराजेंच्या उमेदवारीवर अखेर भाजपकडून शिक्कामोर्तब

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची १२वी यादी मंगळवारी जाहीर केली. साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. (Satara Lok Sabha) यामुळे साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे.

भाजपने पंजाबमधील खडूर साहिब येथून मंजीत सिंह मन्ना मियाविंड, होशियारपूर येथून अनिता सोम प्रकाश आणि बठिंडा येथून आयएएस परमपाल कौर सिद्धू यांचीही उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. साताऱ्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छ. उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने आता उदयनराजेंची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे या मतदार संघात काट्याची लढत पाहायला मिळेल.

१९५२ पासून सातारा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी प्रदीर्घकाळ या मतदार संघाचे नेतृत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत हा मतदार संघ १९९६ चा अपवाद वगळता कायम काँग्रेसचा राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत सातारा लोकसभा मतदार संघावर शरद पवारांच्या विचारांचा प्रभाव व पगडा राहिला. १९९९ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सातारा लोकसभा मतदार संघाने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लोकसभेत पाठवला. १९९९, २००४ या साली लक्ष्मणराव पाटील यांना व २००९, २०१४, २०१९ सलग तीनवेळा छत्रपती उदयनराजे भोसले यांना सातार्‍यातील जनतेने राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार केले. २०१९ साली राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या उदयनराजेंनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार व शरद पवारांचे जिवलग मित्र श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर उभे असलेल्या श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. मोदी लाटेतही हा मतदार संघ शरद पवारांबरोबर राहिला.

सातारा लोकसभा मतदार संघात २०२४ च्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. भाजपने येथून राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा झंझावात उभा केला आहे. सातारा लोकसभा मतदार संघातल्या प्रत्येक तालुक्यात जाऊन उदयनराजेंचे मेळावे होत आहेत. जुन्या चुका दुरुस्त करून उदयनराजे बेरीज करताना दिसत आहेत.

सातारा मतदार संघातील हवा गरम

उदयनराजेंच्या विरोधात शरद पवार कोणाला उतरवणार, याविषयी बर्‍याच अटकळी सुरू होत्या. दस्तुरखुद्द शरद पवारच लढणार, अशीही चर्चा होती. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवायला नकार दिल्यानंतर बाळासाहेब पाटील व शशिकांत शिंदे हे दोनच खमके पर्याय शरद पवारांकडे होते. बाळासाहेब पाटील यांनीही साखर कारखान्याचे कारण सांगून लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी मात्र निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे जाहीर केले. शरद पवारांनाही शशिकांत शिंदेंनाच तिकीट देण्याची इच्छा होती. उदयनराजेंच्या विरोधात भक्कम पर्याय पवारांना हवा होता. शशिकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्याने सातारा लोकसभा मतदार संघातील हवा गरम झाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button