आठवी पास अन् डॉक्टरसह वकीलही निवडणूक रिंगणात | पुढारी

आठवी पास अन् डॉक्टरसह वकीलही निवडणूक रिंगणात

अनिल साक्षी

जम्मू लोकसभा मतदार संघात 26 एप्रिलला मतदान होत असून, यावेळी निवडणूक रिंगणात उतरलेल्या 22 उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी वेगवेगळी असल्याचे दिसून येते. यात आठवी पास ते डॉक्टर, प्राचार्य आणि वकिलांचाही समावेश आहे.

भाजपने जुगल किशोर यांना मैदानात उतरवले आहे. ते दहावी पास आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने रमण भल्ला यांना तिकीट दिले आहे. भल्ला यांच्याकडे विज्ञान आणि कायदा अशा दोन्ही शाखेच्या पदव्या आहेत. याखेरीज वकीलही मैदानात उतरले आहेत. सतीश पुंछी हे या मतदार संघातून निवडणूक लढवित असलेले सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. त्यांचे वय 75 आहे. ते दहावी पास असून, अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. नॅशनल अवामी युनायटेड पक्षाच्या शिखा बंद्राल या सर्वात कमी वयाच्या उमेदवार आहेत. त्या कला शाखेच्या पदवीधर असून, त्यांचे वय 30 आहे.

अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेले सी. डी. शर्मा हे प्राचार्य आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात एमए केले आहे. याखेरीज बीएड, बीए, एलएलबी या अन्य पदव्या त्यांनी मिळविल्या आहेत. अपक्ष उमेदवार परसीन सिंह यांनी विज्ञान शाखेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आणखी एक अपक्ष उमेदवार डॉ. सुरेंद्र सिंह हे जम्मूतील प्रख्यात सर्जन आहेत. डॉ. प्रिन्स रैना यांच्याकडे तर पदव्यांची मालिकाच दिसून येते. एमबीबीएस, एमएस, डीएनबी, एमसीएच आदी पदव्या त्यांच्या नावावर आहेत. तेसुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जम्मू-काश्मीर नॅशनॅलिस्ट पीपल्स फ्रंटचे उमदेवार स्वामी दिव्य नंद आणि अन्य अपक्ष उमेदवार बन्सिलाल हे जेमतेम आठवी पास झालेले आहेत.

या सर्व उमेदवारांची ही शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेता जम्मू लोकसभा मतदार संघातील निवडणूक रंगतदार होईल, असे चित्र दिसत आहे.

जुगल किशोर शर्मा हॅट्ट्रिकसाठी सज्ज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या जुगल किशोर शर्मा यांनी 2014 मध्ये सर्वप्रथम या मतदार संघातून विजय मिळवला. यानंतर गेल्या निवडणुकीत ते पुन्हा यशस्वी झाले. यावेळी ते विजयी हॅट्ट्रिक नोंदविण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी पुन्हा भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. काँग्रेसचे उमेदवार भल्ला यांना पराभूत करून आपण लागोपाठ तिसर्‍यांदा लोकसभेत पोहोचण्यासाठी सज्ज झालो आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button