‘मंडी’च्या गैरवापराला कंगना राणावतने असे दिले उत्तर, की… | पुढारी

‘मंडी’च्या गैरवापराला कंगना राणावतने असे दिले उत्तर, की...

मंडी; वृत्तसंस्था : काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेतनंतर गुजरात काँग्रेसचे एक नेते एस. एस. अहिर यांनी चित्रपट अभिनेत्री तसेच मंडी (हिमाचल) लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार कंगना राणावत यांच्याबद्दल सोशल मीडियावर नको ते वक्तव्य केले. या आक्षेपार्ह पोस्टचे प्रकरण पुढे कमालीचे तापले. पोलिसांपर्यंतही गेले. कंगना यांनी स्वत: आपल्या सोशल मीडिया हँडलवर अहिर यांची पोस्ट शेअर केली आणि या वक्तव्यावर पलटवारही केला.

मतदार संघाचे नाव मंडी आहे आणि मंडीचा अर्थ बाजार असाही होतो. माझे युवा महिला असणे, केंद्रस्थानी ठेवून अहिर यांनी या वक्तव्यातून अत्यंत निम्नस्तराची पातळी गाठलेली आहे, अशी कंगना यांची प्रतिक्रिया आहे. अहिर यांचीच पोस्ट शेअर करून कंगना यांनी जे उत्तर दिले, त्याने नंतर अहिरही खजील झाले. कंगना आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, एखाद्या युवतीला तिकीट मिळाले तर कुप्रवृत्तींकडून तिच्यावर कामुक हल्ले केले जातात, हे विस्तवासारखे भाजून काढणारे वास्तव आहे. मंडी या शब्दाचा वापर लैंगिक संदर्भ देऊन करणे हे गैर आहे. काँग्रेस नेत्यांना हे असे लिहिताना लाज कशी वाटत नाही, याचाच मला प्रश्न पडतो, अशी टीकाही कंगना यांनी केली आहे.

अहिर यांनी पोस्ट मागे घेतली. अकाऊंट लॉक केले. माझ्या अकाऊंटचे अ‍ॅक्सेस अन्य कुणाकडे तरी होते आणि त्याने हा प्रकार केला, असा खुलासा अहिर यांनी केला आहे.

Back to top button