Delhi Corona : दिल्लीत लवकरच लागणार पूर्ण संचारबंदी?; संक्रमण दर पाच टक्क्यांच्या समीप | पुढारी

Delhi Corona : दिल्लीत लवकरच लागणार पूर्ण संचारबंदी?; संक्रमण दर पाच टक्क्यांच्या समीप

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीमध्ये कोरोनाचा (Delhi Corona) संक्रमण दर साडेचार टक्क्यांवर गेला असून येत्या काही दिवसांत हा दर पाच टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅननुसार (जीआरएपी) राजधानीतील निर्बंध आणखी कडक करावे लागतील. त्यानुसार दिल्लीत पूर्ण संचारबंदी देखील लागू केली जाऊ शकते, अशी माहिती दिल्ली सरकारमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सोमवारी दिली.

रविवारी दिल्लीत ((Delhi Corona)) नवीन रुग्णसंख्येमध्ये 3194 ने भर पडली होती. त्यानंतर संक्रमण दर 4.5 टक्क्यांवर पोहोचला होता. दिल्लीत विशेषतः वेगाने फैलावणाऱ्या ओमायक्रॉन स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने बनविलेल्या जीआरएपी नियमानुसार सलग दोन दिवस संक्रमण दर पाच टक्क्यांच्या वर राहिला तर प्रशासनाला पूर्ण संचारबंदी लागू करण्याचा अधिकार मिळू शकतो.

सध्या दिल्लीत जीआरएपी-1 म्हणजे यलो ऍलर्ट लागू आहे. संक्रमण दर पाच टक्क्यांच्या वर गेल्यास अथवा रुग्णसंख्या 16 हजारच्या वर गेल्यास, रुग्णालयांत तीन हजारच्या वर रुग्ण भरती झाल्यास रेड अलर्ट लागू केला जातो. यातील संक्रमण दराच्या आधारे पूर्ण संचारबंदी लागू शकते. हा निर्णय अंमलात आला तर शिक्षणसंस्था, दुकाने, इतर व्यावसायिक आस्थापने, जलतरण तलाव, मैदाने बंद करावी लागतील.

हेही वाचलं का?

Back to top button