हिंगोली : बाळापूर – डोंगरकडा मार्गावर कामगारांची बस उलटली, पंधरा जण जखमी | पुढारी

हिंगोली : बाळापूर - डोंगरकडा मार्गावर कामगारांची बस उलटली, पंधरा जण जखमी

हिंगोली / पुढारी वृत्तसेवा
आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर जामगव्हाण पाटीजवळ रायपूर (छत्तीसगड) येथून सोलापूरकडे कामासाठी जाणाऱ्या कामगारांची खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ कामगार जखमी झाले. आज ( दि. ३ ) पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. एका कामगाराची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रायपूर (छत्तीसगड) येथून सुमारे ६० कामगार कामासाठी सोलापूर येथे खासगी बसने (क्र.सीजी -०८-एएल- ६०२५) जात होते. आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर जामगव्हाण पाटीजवळ पहाटे पाच वाजता वळण रस्त्यावरून बस पुढे घेत असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन बस उलटली. त्यामुळे पहाटे साखर झोपेत असलेल्या कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार शेख बाबर, भगवान वडकिले, चालक भारत मुलगीर, गजानन मुटकुळे ,डाखोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने दोन रुग्ण वाहिका बोलावून बसमधील जखमींना बाहेर काढून १५ जणांना दोन्ही रुग्णवाहिकेतून नांदेडला उपचारासाठी पाठविले. उर्वरीत कामगार किरकोळ जखमी आहेत.

हेही वाचलं का?

 

Back to top button