Kulagar Agriculture : गोव्यातील कुळागर राष्ट्रीय पातळीवर झळकणार - पुढारी

Kulagar Agriculture : गोव्यातील कुळागर राष्ट्रीय पातळीवर झळकणार

पिनाक कल्लोळी, पणजी : गोव्यातील बागायती शेतीचा (Kulagar Agriculture) पारंपरिक प्रकार असणारी कुळागरे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसण्याची शक्यता आहे. गोव्यातील केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्थेने परेडमध्ये होणाऱ्या चित्ररथ प्रदर्शनासाठी कुळागरांचा चित्ररथ दाखविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. संस्थेचे संचालक प्रवीण कुमार यांनी ही माहिती दिली.

प्रवीण कुमार यांनी सांगितले की, कुळागर हा गोवा आणि कोकणातील शेतीतील एक स्वयंपूर्ण प्रकार आहे. ही शेती पद्धती नैसर्गिक आणि आरोग्यदायी आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या आनंदाचे एक कारण कुळागरे आहेत.  यामुळेच आम्ही ‘कुळागर-कोकणातील आनंदाचा खजिना’ या नावाने चित्ररथ संकल्पना करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. यामुळे ग्रामीण गोव्यातील कृषि संस्कृतीची माहिती देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला होण्याची शक्यता आहे.

गोवा म्हंटलं की, सर्वांसमोर समुद्र किनारे, दारू, कॅसिनो असेच एकांगी चित्र निर्माण झाले आहे. निसर्गाने वरदहस्ताने देगणी दिलेला ग्रामीण गोव्याची ओळख समोर येत नाही. अशावेळी गोव्याच्या कृषी संस्कृतीमधील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार लोकांना समजला तर त्याचा फायदा पर्यटनालाही होऊ शकतो, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्थेचे संचालक प्रवीण कुमार म्हणाले की, “कुळागर शेतीमध्ये पारंपरिक (Kulagar Agriculture) कृषीची बुद्धिमत्ता दिसून येते. येथे केळी, सुपारी, नारळ, जायफळ, मिरी अशी विविध पिके एकाच ठिकाणी घेतली जातात. या पिकांची लागवड अशी केली जाते की, कोणतीही जागा रिकामी राहत नाही अथवा वाया जात नाही. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे येथील मातीचा दर्जाही टिकून राहतो आणि उत्पन्नही चांगले मिळते. यासाठीच आम्ही राजपथावरील परेडसाठी कुळागर संकल्पनेची शिफारस केली आहे.”

मळकर्णेचे कुळागर शेतकरी उमेश प्रभू मळकर्णेकर म्हणाले की, “कुळागर हे गोयकारपणाचे प्रतीक आहे. गोव्याचे कुळागर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये येत असतील तर ती नक्कीच चांगली बाब आहे.  पर्यटनाच्या दृष्टीकोनातून गोव्याचे एकांगी चित्र दाखविले जाते. त्यामुळे ग्रामीण आणि कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठीही कुळागराचा विचार होऊ शकतो.”

पहा व्हिडीओ : चला सफर करूया हिमाचल प्रदेशच्या रघुपूर किल्ल्याची

Back to top button