सावधान ! उसाची धोकादायक वाहतूक | पुढारी

सावधान ! उसाची धोकादायक वाहतूक

दक्षिण सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात अनेक उसाचे कारखाने आहेत. त्यामुळे कारखान्यांना ऊस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उसाची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यात येते. मात्र, ट्रॅक्टरवरील ऊस वाहतूक धोकादायक ठरत आहे. तालुक्यामध्ये ऊस वाहतूक ट्रॅक्टरच्या अपघातात अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. यास जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात आणि तालुक्याजवळ बर्‍याच साखर कारखान्यांनी गाळपास सुरुवात केलेली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झालेली आहे. याचबरोबर दक्षिण सोलापूर तालुक्यातून इतर ठिकाणच्या कारखान्यांसाठी उसाची वाहतूक वाढलेली आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात साखर कारखाने सुरु झाल्यापासून अपघातांत वाढ झालेली दिसून येत आहे.

उसाची वाहतूक ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाते. यामध्ये ट्रॅक्टरचा सर्रास अपघात होतो. याकडे कुणाचेही लक्ष नाही. तालुक्यात दररोज कुठेना कुठे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये अनेकदा जीवितहानीदेखील झालेली आहे. अनेक निष्पाप लोक आपल्या प्राणाला मुकले आहेत.

साखर कारखाने सुरू झाले की, ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून मिनी ट्रेनमधून त्याची वाहतूक करण्यासाठी अधिक पसंती दिली जाते. बहुतेक शेतकर्‍यांकडे ट्रॅक्टर असल्याने आपला ट्रॅक्टर उसाच्या वाहतुकीसाठी कारखान्याकडे भाडेतत्त्वावर लावला जातो. काही ट्रॅक्टर मालक हे कारखान्याचे सभासद आहेत. ट्र्ॅक्टर ट्रॉलीमधून ऊस वाहतुकीसाठी काही नियमावलीदेखील आहे.

पण हल्ली याकडे ना साखर कारखान्याचे, ना वाहतूक पोलिसांचे ना ट्र्ॅक्टर मालकांचे लक्ष आहे. त्यामुळे दररोज एक-दोन छोटे-मोठे ट्रॅक्टरचे अपघात कोणत्या ना कोणत्या साखर कारखान्याच्या भागात सर्रास पाहावयास मिळतात. बर्‍याच ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागे रिफ्लेक्टर्स नाहीत.

त्यामुळे ग्रामीण भागातून या ट्रॉल्या जात असताना पाठीमागून धडकून अनेक अपघात घडलेले आहेत. याकडे वाहतूक पोलिसांसह साखर कारखाने आणि वाहन मालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. ट्र्ॉलीमध्ये ऊस भरण्यासाठीदेखील काही नियमावली आवश्यक आहे.
एखाद्या ट्रॉलीमध्ये किती ऊस भरला जावा, हे निश्चित होणे आवश्यक आहे. ट्रॉलीतून उसाची वाहतूक करताना त्यातून उसाच्या मोळ्या चालत्या ट्रॉलीतून खाली कोसळत असतात.

मात्र वाहनचालक वाहन न थांबवता तसाच बेदरकारपणे वाहन चालवत असतो. अशावेळी अनेक दुचाकीस्वार अंगावर ऊस, उसाची मोळी पडल्याने जखमी झाले आहेत. उसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत घेऊनच ओव्हरटेक करावा लागतो. ऊस भरतानादेखील ट्र्ॉलीमध्ये उभे केलेले खांब मजबूत आणि व्यवस्थित बसले आहेत का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही. बर्‍याचदा ट्रॉली तिरपी झालेली असतानाही जोखीम पत्करुन उसाची वाहतूक करण्यात येते.

त्यांना कोणाताही वाहतूक पोलिस थांबवून सूचना करताना दिसत नाही. त्यामुळे अनेकदा भर रस्त्यातच या ट्र्ॉल्या पलटी झालेल्या पाहावयास मिळतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, वाहतुकीची कोंडी होत याशिवाय शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक लोक अपघातग्रस्त वाहनातून ऊस पळविण्याचा प्रयत्न करतात.

याचादेखील भ्ाुर्दंड शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. चूक ट्र्ॅक्टरचालकांची, नुकसान शेतकर्‍याचे, फायदा साखर कारखानदारांचा, त्रास मात्र सर्व जनतेला सहन करावा लागत आहे. हे केवळ ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरकडे वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे होत आहे.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
गाळप हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक सुरू आहे. मात्र ट्रॅक्टरमधून धोकादायक उसाची वाहतूक सुरू आहे. ट्रॅक्टरवरून होत असलेल्या धोकादायक उसाच्या वाहतुकीमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कारखानदारांचे याकडे लक्ष नाही. सर्वसामान्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.

Back to top button