वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : आगामी नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीची आग्रही भूमिका आहे. मात्र शिवसेनेकडून सन्मानजनक पर्याय आला नाही तर स्वतंत्र निवडणूक लढविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक काका कुडाळकर यांनी दिली.
वैभववाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कुडाळकर बोलत होते. विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष डॉ.अभिनंदन मालंडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, कृषी संघटना जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, सरचिटणीस तथा तालुका निरीक्षक रुपेश जाधव, तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शहर अध्यक्ष अशोक शिंदे, युवा शहर अध्यक्ष वैभव रावराणे, रविदास पवार, साजिद पाटणकर, नंदू पवार आदी उपस्थित होते.
कुडाळकर म्हणाले, आगामी वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पदाधिकार्यांसमवेत चर्चा केली.निवडणुकीसंदर्भात एक ढोबळ आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याशी विचारविनिमय करुन येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. भाजपाप्रेरित सत्ता केंद्र महाविकास आघाडीकडे खेचून आणण्याचे काम केले जात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाविकास आघाडी व्हावी, ही भूमिका असून यासाठी आम्ही आग्रही आहोत. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली आहे.
त्यांच्या भूमिकेचा आदर ठेवून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. हुकुमशाही पध्दतीने वागणार्या केंद्र सरकारला व भाजपला धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा. आघाडीसाठी चांगली भूमिका घ्यावी असा सल्ला त्यांनी जिल्हा काँग्रेसला दिला आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत महाविकास आघाडीबाबत फार आग्रही आहेत. काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षानी एकत्र येऊन काम करावे, अशी त्यांची इच्छा असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले.
उमेदवारीबाबत राष्ट्रवादीकडून कोणतीही अवाजवी मागणी केली जाणार नाही. उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता, भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्याची क्षमता विचारात घेऊ. संख्याबळाचा आग्रह आम्ही धरणार नाही.सत्ताधारी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न कले जातील.नगरपंचायत निवडणुकीत सद्यस्थितीत प्राथमिक माहितीनुसार सहा-सात ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद आहे. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा मुख्य उद्देश असल्यामुळे तडजोड केली जाईल असे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. काँग्रेसने आघाडीत येण्यास नकार दिला तरीही आम्ही शिवसेनेसोबत आघाडीसाठी राष्ट्रवादी आग्रही राहील, असेही कुडाळकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.