छत्रपती संभाजीनगर : पैठण येथे गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथे गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई

पैठण ; चंद्रकांत अंबिलवादे कामदा एकादशीच्या पहाटे पैठण शहरातील खाटीक वाडा परिसरात राजरोसपणे गोमांस विक्री करणाऱ्या विरुद्ध ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पथक व पैठण पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यामध्ये गोमाससह ५० वेगवेगळ्या जनावरांची कातडी मुद्देमाल जप्त केला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील नेहरू चौक भागातील खाटीकवाडा येथे अवैधरित्या गोमांसाची राजरोसपणे विक्री करण्यात येत होती. याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांच्या पथकाला मिळाली. त्‍यावरून आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान विशेष पथक व पैठण पोलीसांनी मांस विक्री व कापीत असलेल्या ठिकाणी अचानक संयुक्त छापा मारला. यावेळी पोलीस कारवाई झाल्यामुळे सराईत गोमासविक्री करणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली.

पोलीस पथकाने या ठिकाणी झाडाझडती घेतली. यावेळी ३ क्‍विंटल गाेमांस व ५० वेगवेगळया जणावरांचे कातडे आढळून आले. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरील गोमांस कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी स्वच्छता कर्मचारी पोलिसांना उपलब्ध करून दिले असून, ही कारवाई विशेष पोलीस अधीक्षक पथकाचे सपोनि सुदाम शिरसाट, पोह विष्णू गायकवाड, नवनाथ कोल्हे, पोलीस नाईक गणेश सोनवणे, धापसे, पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह पोलीस नाईक भाऊसाहेब वैद्य, राजेंद्र जिवडे, भराटे, चव्हाण, तांबे यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button