नाशिकच्या जागेवर मनसेचा दावा; युतीत तिढा वाढणार | पुढारी

नाशिकच्या जागेवर मनसेचा दावा; युतीत तिढा वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली तरी, महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम असून, सोबतच्या पक्षाला किती जागा सोडायच्या यामुळे जागावाटपाचे घोंगडे भिजत पडल्याची चर्चा आहे. काल-परवापर्यंत स्वतंत्र भूमिकेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी महायुतीचे द्वार ठोठावल्याने, जागेचा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीवारी करीत, किमान तीन जागांची मागणी भाजप श्रेष्ठींकडे केली आहे. त्यात नाशिकच्या जागेचा समावेश असल्याने गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचा असला तरी, या मतदारसंघात भाजपची ताकद अधिक असल्याने हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, अशी मागणी सुरुवातीपासूनच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. दुसरीकडे शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्याने नाशिक लोकसभेवरून भाजप-सेना आमने सामने आली आहे. आता मनसेनी या जागेची मागणी केल्याने, तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी भाजप नेते गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेत नाशिकसह दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांच्या या मागणीमुळे मनसैनिकांमध्ये देखील हुरूप निर्माण झाला असून, नाशिक लोकसभेची जागा मनसेला सोडावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. दरम्यान, तिन्ही पक्षांच्या चढाओढीमध्ये नाशिकची जागा नेमकी कोणाच्या पारड्यात पडणार याची नाशिककरांमध्ये चर्चा रंगत आहे.

नाशिककरांनी मनसेला दिलेले वैभव
२००९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविताना मनसे उमेदवाराने विजयी उमेदवारास चांगलाच घाम फोडला होता. मनसेकडून हेमंत गोडसे यांनी तब्बल दोन लाख १६ हजार ४७४ मते मिळविली होती. तर राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी दोन लाख ३८ हजार ७०६ मते मिळवत अवघ्या २२ हजार ३२ मतांनी विजय मिळवला होता. मनसेच्या या दमदार कामगिरीच्या बळावर मनसेला २००९च्या विधानसभा निवडणुकीत अधिकृत रेल्वे इंजीन हे निवडणूूक चिन्ह प्राप्त झाले होते. पुढे शहरात मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. शिवाय महापालिकेत ३९ नगरसेवकांसह सत्ता प्राप्त केली होती.

नाशिक मनसेचा बालेकिल्ला असून, २००९ व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मनसे सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसेउमेदवारांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या जागेवर मनसेचा हक्क असून, ही जागा मिळाल्यास नाशिकमध्ये निश्चितपणे मनसेचा खासदार असेल. या मतदारसंघासाठी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत.                                                    – सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे.

Back to top button