पुढारी विशेष : पाच वर्षांत नाशिकमध्ये २९४ मातांचा मृत्यू | पुढारी

पुढारी विशेष : पाच वर्षांत नाशिकमध्ये २९४ मातांचा मृत्यू

नाशिक : आसिफ सय्यद

केंद्र आणि राज्य शासनाकडून मातामृत्यू दर रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना नाशिकसारख्या ‘मेडिकल हब’ म्हणून नावारूपास आलेल्या शहरात गेल्या पाच वर्षांत तब्बल २९४ मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे मातांचा सर्वाधिक मृत्यू हा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झाला आहे. मृत मातांमध्ये बहुतांश शहरालगतच्या ग्रामीण भागातील आहेत.

राज्यामध्ये मातामृत्यू दर रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपायोजना केल्या जातात. यामध्ये जनजागृती, सोयी, सुविधांची माहिती आणि पोस्टर लावले जातात. मात्र, हे सर्व करूनही नाशिकसारख्या शहरात मातामृत्यू दर कमी होत नसल्याचे वास्तव आहे. मातामृत्यू म्हणजे गरोदरपणा, गर्भपात, बाळंतपण किंवा बाळंतपणानंतर सहा आठवड्यांत झालेला मृत्यू. मातामृत्यू दर वाढण्याची कारणेही अनेक आहेत. सध्याच्या अनियंत्रित जीवनशैलीमध्ये उच्च रक्तदाबाची प्रमुख समस्या अनेक महिलांमध्ये दिसून आली आहे. प्रसूतीकाळात, गर्भपातादरम्यान अतिरक्तस्त्राव हे मातेच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. २०२० ते २०२२ या दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या काळात अनेक मातांना कोरोनाची लागणदेखील झाली होती. त्यामुळे होणारी गुंतागुंत यामुळेही या काळात मातामृत्यूचे प्रमाण वाढले होते, असे सांगितले जाते.

मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. शक्यतो पहिल्या तीन महिन्यांच्या आत गर्भवती मातांची नावनोंदणी केली जाते. यानंतर गर्भवतीची रक्ततपासणी, सोनोग्राफी केली जाते. या अहवालातून समोर आलेल्या निष्कर्षाच्या आधारे पुढील उपचार सुरू केले जातात. थायरॉईड, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या गर्भवतींच्या कार्डवर ‘हायरिस्क पेशंट’ अशी नोंद करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १० पेक्षा कमी आढळल्यास लोहयुक्त गोळ्यांबरोबर रक्तवाढीचे इंजेक्शनही गर्भवतींना दिले जाते. हायरिस्क पेशंटच्या बाबतीत सुपर स्पेशालिटीची गरज भासत असल्याने असे रुग्ण जिल्हा रुग्णालय अथवा मविप्र रुग्णालयाकडे पाठविले जातात.

कोरोनाकाळात सर्वाधिक १३४ मृत्यू
गेल्या पाच वर्षांतील २९४ माता मृत्यूंमध्ये २०२०-२१ ते २०२१-२२ या दरम्यान कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक १३० मातांचा मृत्यू झाला होता. या काळात लोकांना घराबाहेर निघणेदेखील शक्य नव्हते. तसेच ग्रामीण भागामध्ये दळण-वळणाची साधनेदेखील नव्हती. त्यामध्ये गर्भवती महिलांना उपचार घेण्यासाठी रुग्णालयामध्ये पोहोचता येत नव्हते, मातांना झालेली कोरोनाची लागण व त्यानंतर उद‌्भवलेली गुंतागुंत यामुळे माता व नवजात बालकांचा मृत्यू ओढावल्याचे दिसून आले.

मातामृत्यूची कारणे…
गर्भधारणेदरम्यान आणि त्यानंतरच्या गुंतागुंतीमुळे आणि बाळंतपणामुळे महिलांचा मृत्यू होतो. यापैकी बहुतेक गुंतागुंत गर्भधारणेदरम्यान विकसित होतात आणि बहुतेक प्रतिबंध करण्यायोग्य किंवा उपचार करण्यायोग्य असतात. इतर गुंतागुंत गर्भधारणेपूर्वी अस्तित्वात असू शकतात परंतु गर्भधारणेदरम्यान त्या बिघडतात, गर्भपात किंवा बाळंतपणात तीव्र रक्तस्त्राव, बाळांतपणानंतर होणारे संक्रमण, गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब, असुरक्षित गर्भपात, अशी मातामृत्यूची अनेक कारणे आहेत.

मातामृत्यू टाळण्यासाठी…
मातामृत्यू टाळण्यासाठी, अनपेक्षित गर्भधारणा रोखणे आवश्यक आहे. किशोरवयीन मुलींसह सर्व महिलांना गर्भनिरोधक, कायद्याच्या पूर्ण मर्यादेपर्यंत सुरक्षित गर्भपात सेवा आणि गर्भपातानंतरची दर्जेदार काळजी मिळणे आवश्यक आहे. बहुतेक मातामृत्यू टाळता येण्याजोगे असतात, कारण गुंतागुंत टाळण्यासाठी किंवा व्यवस्थापित करण्यासाठी काळजी घेतली जाणे महत्त्वाचे आहे. सर्व महिलांना गरोदरपणात आणि बाळाच्या जन्मादरम्यान आणि नंतर उच्च दर्जाची काळजी घेणे आवश्यक आहे. वेळेवर योग्य उपचार न मिळणे माता तसेच नवजात मुलांच्या मृत्यूचे कारण ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग
मातामृत्यू बरोबरच प्रसूतीदरम्यान नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. गर्भधारणेच्या ३६ आठवड्यांच्या आत जन्मलेली नवजात बालकांची शारीरिक वाढ पूर्णपणे झालेली नसते. अशा नवजातांची विशेष काळजी न घेतल्यास ते दगावतात. यासाठी महापालिकेने जुने नाशिक परिसरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात सीएनपी प्रेसच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नवजात बालक अतिदक्षता गृहाची उभारणी केली आहे. तर नाशिक रोड विभागातील स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून नवजात बालक अतिदक्षता विभाग उभारला जात आहे.

गत पाच वर्षांतील मातामृत्यूची स्थिती
वर्ष                             मातामृत्यूची संख्या
२०१९ -२०                         ६८
२०२०-२१                          ६९
२०२१-२२                          ६१
२०२२-२३                          ४५
२०२३-फेब्रुवारी २०२४          ५१
एकूण                              २९४

मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात. गर्भवतींची नोंदणी करून रक्ततपासणी, सोनोग्राफी केल्यानंतर हायरिस्क मातांना तत्काळ उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. नवजात बालकांसाठीदेखील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय व स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात विशेष अतिदक्षता विभागाची उभारणी केली जात आहे. – डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

Back to top button